LIVE UPDATES

सिंधुदुर्गच्या मतदार यादीत ८२ हजारांहून अधिक नावे वगळली

नाव वगळले गेले असल्यास ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकतींची संधी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 19:20 PM
views 45  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गच्या आगामी निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली असून, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR-2026) जिल्ह्याच्या मतदार यादीत मोठी छाटणी करण्यात आली आहे. पूर्वीच्या ६ लाख ८८ हजार १४ मतदारांपैकी तब्बल ८२ हजार ५१७ नोंदी वगळण्यात आल्याने आता जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादीत ६ लाख ५ हजार ४९९ मतदार राहिले आहेत. त्यामुळे या पुनरीक्षणामुळे सिंधुदुर्गच्या निवडणूक चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता असून, प्रत्येक मतदाराने आपले नाव पुन्हा तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक बालाजी शेवाळे उपस्थित होते.

वगळण्यात आलेल्या नोंदींचा तपशील पाहता ३६ हजार ६०९ मृत मतदार, ३३ हजार ७६६ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, ७ हजार ६६७ दुबार नोंदी, तर ४ हजार ४८३ इतर कारणांमुळे अपात्र अथवा शोधूनही न सापडलेल्या नोंदी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक आणि प्रत्यक्ष वास्तवाशी सुसंगत करण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कणकवलीत सर्वाधिक मतदार

प्रारूप यादीमध्ये जिल्ह्यात ३ लाख ५ हजार ७५६ पुरुष आणि २ लाख ९९ हजार ७४३ महिला मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण ९२१ मतदान केंद्रे आहेत.

कणकवली विधानसभा मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रांवर २ लाख ९ हजार २४२ मतदार, कुडाळ मतदारसंघात २७९ मतदान केंद्रांवर १ लाख ९१ हजार ८४६ मतदार, तर सावंतवाडी मतदारसंघात ३१० मतदान केंद्रांवर २ लाख ४ हजार ४११ मतदार नोंदविण्यात आले आहेत.

‘नाव आहे की नाही?’ प्रत्येक मतदाराने तपासावे

SIR प्रक्रियेमुळे हजारो नोंदी वगळण्यात आल्याने मतदारांनी केवळ मतदानाच्या वेळी नाव असल्याची अपेक्षा न ठेवता आत्ताच आपले नाव तपासणे आवश्यक आहे. नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करण्याची संधी प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.

३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती सादर करता येणार आहेत. प्राप्त दावे-हरकतींवर सुनावणी घेऊन २९ ऑक्टोबरपर्यंत निपटारा केला जाणार असून, त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक ६, तसेच आवश्यकतेनुसार इतर विहित नमुन्यांचा वापर करता येणार आहे. Voter Helpline App आणि ECINet या माध्यमातूनही मतदारांना नोंदणी व दुरुस्तीची प्रक्रिया करता येईल.

‘एकही पात्र मतदार वंचित राहू नये’

“अचूक आणि अद्ययावत मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने प्रारूप मतदार यादी तपासून आपले नाव व तपशील योग्य असल्याची खात्री करावी. काही त्रुटी अथवा नाव वगळले असल्यास विहित मुदतीत दावे-हरकती सादर कराव्यात,” असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

८२ हजारांहून अधिक नोंदींची छाटणी झाल्याने आता प्रशासनाच्या पुनरीक्षणाबरोबरच नागरिकांच्या जागरूकतेचीही कसोटी लागणार आहे. अंतिम यादीत पात्र मतदाराचे नाव कायम राहावे आणि अपात्र नोंदी दूर व्हाव्यात, यासाठी पुढील महिनाभर सिंधुदुर्गात मतदार पडताळणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.