
सिंधुदुर्गनगरी : मालवणी भाषा ही केवळ बोलीभाषा नसून कोकणची समृद्ध सांस्कृतिक ओळख आहे. या भाषेचा अधिक व्यापक अभ्यास व्हावा, तिचे संवर्धन आणि संशोधन व्हावे यासाठी सिंधुदुर्गात मराठी भाषेचे जिल्हा विकास केंद्र स्थापन करण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून प्रामुख्याने मालवणी भाषेवर संशोधन केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.
कोकणसादच्या ३७ व्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, कोकणसादचे संपादक संचालक संजय ढवळीकर, मुख्य संपादक सागर चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, दशावतार कलावंत गौरव शिर्के आदींसह टीम कोकणसादचे प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते.
कोकणसादने यंदाच्या दिवाळी अंकात दशावतार कलेला दिलेले स्थान विशेष कौतुकास्पद असल्याचे सांगताना सामंत म्हणाले, दशावताराच्या निमित्ताने तयार करण्यात आलेले हे पुस्तक म्हणजे दशावताराची परंपरा काय आहे आणि ही कला नेमकी किती समृद्ध आहे, हे जगाला समजावून सांगणारा दस्तऐवज आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, त्यातील कलावंतांची छायाचित्रे आणि मांडणी पाहिल्यानंतर दशावतार कलेचे मोठेपण लक्षात येते. कोकणसादने या माध्यमातून दशावतार परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
मराठी भाषेच्या विकासाबरोबरच तिच्या विविध बोलीभाषाही समृद्ध झाल्या पाहिजेत, ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मालवणी, शिसंगेश्वरी, आगरी अशा विविध बोलीभाषा या मराठी भाषेचे वैभव आहेत. या सर्व बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे.
आमदार निलेश राणे यांनी मालवणी भाषेला मराठी भाषा विभागात समाविष्ट करून तिच्या विकासासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना सामंत म्हणाले, यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. या निमित्ताने मराठी भाषेचा एक विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मराठी भाषेचे जिल्हा विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल. या केंद्रामध्ये मालवणी भाषेवर विशेष संशोधन केले जाईल.
मालवणी भाषा आज दशावतार बांधवांच्या माध्यमातून समुद्रापलीकडेही पोहोचली आहे. या भाषेचा आवाका, तिचे वैशिष्ट्य आणि तिचा विस्तार जगासमोर आणण्यासाठी या संशोधन केंद्राच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कोकणसादच्या दिवाळी अंकाला यापूर्वी शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. यंदाही या अंकाला पुरस्कार मिळावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. मात्र, या अंकाचे खरे महत्त्व त्यातील आशय आणि सांस्कृतिक विषयांच्या मांडणीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकारितेच्या भूमिकेवर भाष्य करताना सामंत म्हणाले, कोकणसादचे आमच्याबरोबर जसे सहकार्याचे नाते आहे, तसेच नाते कायम राहावे. माध्यमांनी आमच्यावर टीका करावी, आमच्याकडून चूक झाली तर ती ठामपणे दाखवून द्यावी. मात्र, आम्ही योग्य असू तर आमची बाजूही समाजासमोर मांडावी. चुकलेल्याला सुधारणे हे चौथ्या स्तंभाचे काम आहे. गरज पडल्यास चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची भूमिका माध्यमांनी घेतली पाहिजे.
कोकणसादचा दिवाळी अंक अत्यंत सुंदर आणि दर्जेदार झाला असून, त्याची किंमत ३०० रुपये आहे. वाचकांनी हा अंक मोफत न घेता त्याचे मूल्य देऊनच खरेदी करावा. आम्हालाही जे अंक दिले जातील त्याचे पैसे द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोकणसादच्या या उपक्रमाचे अभिनंदन करताना निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








