LIVE UPDATES

कुणकेरीतील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 18, 2026 16:48 PM
views 26  views

सावंतवाडी : कुणकेरी गावातील माजी विद्यार्थी संघाच्यावतीने जि. प. शाळा कुणकेरी नं. १ येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी जि. प. शाळा कुणकेरी नं. १, २ व ३ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्रीधर पाटील यांनी आपल्या अधिकारी होण्याच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी सांगितली. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकते, असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला. माजी विद्यार्थी संघामार्फत तहसीलदार श्रीधर पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. पुढील काळात कुणकेरी गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे माजी विद्यार्थी संघाने यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे माजी विद्यार्थी मनोज घाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.  याप्रसंगी कुणकेरीचे उपसरपंच सुनील परब, सामाजिक कार्यकर्ते बावतीस फर्नांडिस (चराठे), मनोज घाटकर, राजन मडवळ, कैलास परब, गुरुदास कुणकेरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश परब, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम माजी विध्यार्थी-   केशव सावंत, ब्रिजेश सावंत, नरेश परब - कैलास परब , महेश बाबू सावंत, सचिन मोहन सावंत , आनंद पुजारी  प्रशांत सावंत (मधलीवाडी ), मनोज घाटकर यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे संपन्न झाला त्यांचे श्री. घाटकर यांनी विशेष आभार मानले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारे असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि. प. शाळा कुणकेरी नं. ३ च्या उपशिक्षिका श्रीमती निता नितीन सावंत यांनी केले.