
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'एल निनो'च्या प्रभावामुळे तापमानात वाढ झाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याची दखल घेत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १९ ते ३० जून या कालावधीत सकाळच्या सत्रात ७.०० ते ११.१५ या वेळेत भरविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी जारी केले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर तसेच विविध माध्यमिक शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील माध्यमिक शाळाही उद्यापासून सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याबाबतचे अधिकृत आदेशही थोड्याच वेळात जारी होणार असल्याची माहिती जि.प.प्रशासन आणी माध्यमिक विभागाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, निर्जलीकरण आणि उष्णतेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांकडून स्वागतार्ह मानले जात आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस गायब झाल्याने प्रचंड उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.










