
सावंतवाडी : कोकणातील हापूस आंबा आज जगप्रसिद्ध असला, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक गावठी आंबे, रतांबे, फणस आणि पेरू यांची झाडे हळूहळू दृष्टीआड होत चालली आहेत. या नामशेष होत चाललेल्या पारंपारिक वृक्षांना पुन्हा संजीवनी देण्यासाठी आणि वन्य प्राण्यांना मानवी वस्तीपासून रोखण्यासाठी कलंबिस्त गावात एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. कलंबिस्त पंचक्रोशी मर्यादित दुग्ध व्यवसायिक संस्था आणि शिवसाम्राज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने धावगिरेश्वर देवस्थान परिसरातील मोकळ्या पडीक जागेत सुमारे ७० पारंपारिक गावठी आंबे, मिरी आणि पेरू अशा १०० हून अधिक वृक्षांची लागवड रविवारी करण्यात आली.
कोकणात होळी सणात प्रत्येक गावात किमान एका तरी आंब्याच्या झाडाचे होळी म्हणून पूजन केले जाते. तसेच घराच्या बांधकामासाठी या झाडांचा वापर होतो. मात्र, सध्या कलमी हापूस व पायरीची लागवड वाढली असून, सिमेंटच्या युगात पारंपारिक गावठी आंबे आणि पेरूची लागवड पूर्णपणे थांबली आहे. ही वृक्षसंपदा टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेतला असून, पडीक जागेत आंबा व फणसाच्या बियांची पावसाळ्यात पेरणी करणे आणि जंगलातून गावठी आंब्यांची रोपे शोधून ती लावण्याची मोहीम हाती घेतली आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नैसर्गिक उपाय
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकड, गवारेडे, हत्ती आणि वनगाई यांचा गाववस्तीतील वावर वाढला असून, प्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी शेती-बागायती सोडल्या आहेत. परप्रांतियांनी डोंगर-दऱ्यांवर वस्त्या वाढवल्यामुळे वन्य प्राण्यांचे अधिवास आणि खाद्य नष्ट झाले आहे. या प्राण्यांना त्यांचे नेहमीचे खाद्य जंगलातच मिळावे, जेणेकरून ते मानवी वस्तीपासून दूर राहतील, या हेतूने पडीक व डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर पेरू व फळझाडांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमप्रसंगी दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲड. संतोष सावंत, सचिव व माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, उपाध्यक्ष लक्ष्मण राऊळ, प्रकाश तावडे, राजन घाडी, संदीप सावंत आणि बाळकृष्ण मेस्त्री उपस्थित होते. तसेच शिवसाम्राज्य संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, रोहन सावंत, सुभाष उर्फ आप्पाजी देसाई, स्वप्नील सावंत, विकी सावंत, विराज सावंत आणि शेखर मेस्त्री यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. या मोहिमेला सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ आबा सावंत आणि भारत, पाक व चीन युद्धातील सैनिक विठ्ठल सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.
पर्यावरण समृद्धीचा संदेश
घरटी सैनिक परंपरा असलेल्या कलंबिस्त गावातील तरुणांनी निसर्ग, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन आणि कृषी क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन सिद्धेश सावंत व रोहन सावंत यांनी केले. तर, संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी असा उपक्रम राबवून गाव समृद्ध केले जाईल, असे प्रतिपादन रमेश सावंत यांनी केले. "प्रत्येकाने किमान एक तरी पारंपारिक फळझाड लावून कोकणची जुनी शान आणि जान परत मिळवून द्यावी," असा संदेश ॲड. संतोष सावंत यांनी याप्रसंगी दिला.










