LIVE UPDATES

दारुम गावातील देवराई संवर्धनासाठी झाडे दत्तक उपक्रम

दिवंगत आई-वडिलांच्या स्मरणार्थ दिगंबर तळेकर यांचा प्रेरणादायी पुढाकार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 09, 2026 10:38 AM
views 460  views

कणकवली : कोकणातील देवराई ही केवळ वृक्षसंपदा नसून सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि पर्यावरणीय वारशाचे जिवंत प्रतीक मानली जाते. एकेकाळी गावाच्या वेशीवरील संपन्न देवराईमुळे जैवविविधतेचे संवर्धन होत होते. तसेच शेतीला उपद्रव करणाऱ्या वानर, रानडुक्कर, नीलगाय आदी वन्यप्राण्यांवरही नैसर्गिक नियंत्रण राहण्यास मदत होत होती. मात्र, बदलत्या काळात देवराईंचे क्षेत्र आकसत चालल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत असून त्याचे परिणाम मानवी जीवनावरही जाणवू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील दारुम ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी देवराईचे जुने वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार, दि. ८ जुलै रोजी गावातील नागरिक दिगंबर तळेकर यांनी आपल्या दिवंगत आई-वडिलांच्या स्मरणार्थ देवराईतील काही झाडांचे पालकत्व स्वीकारले. ही झाडे मोठी होईपर्यंत त्यांचा संपूर्ण सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. दारुम गावातील देवराई तब्बल ३५ एकर क्षेत्रावर विस्तारलेली असून तिचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.या उपक्रमासाठी आवश्यक रोपे उपलब्ध करून देण्यात युवा सरपंच कु. तेजस्वी लिंगायत आणि उपसरपंच प्रवीण तळेकर यांनी मोलाचे योगदान दिले.

वृक्षारोपण कार्यक्रमास सरपंच कु. तेजस्वी लिंगायत, उपसरपंच प्रवीण तळेकर, पंचायत समिती सदस्य अण्णा खाडये, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक तळेकर, माजी सरपंच संतोष तळेकर, मुख्याध्यापक कुडाळकर, नरेंद्र तळेकर, अन्य मान्यवर तसेच दारुम शाळेचे विद्यार्थी देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी दिगंबर तळेकर यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करत त्यांचा गौरव केला. यावेळी मान्यवरांनी दिगंबर तळेकर यांच्या प्रेरणादायी पुढाकारातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने देवराई संवर्धनासाठी झाडे दत्तक घेण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. दिगंबर तळेकर यांनीही भविष्यात दारुम देवराईच्या संवर्धनासाठी कोणालाही सहकार्य करण्यास आपण सदैव तत्पर राहू, असे मनोगत व्यक्त केले.देवराई संवर्धनासाठी लोकसहभागातून सुरू झालेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासोबतच भावी पिढ्यांसाठी समृद्ध नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरत आहे.