LIVE UPDATES

कणकवली शहरातील वाहतूक कोंडी सुटेना

बसस्थानकासमोर कार पार्किंगमुळे पाऊण तास वाहतूक ठप्प
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 16, 2026 18:54 PM
views 1155  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली :  शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात खरेदीसाठी नागरिक आणि कोकणवासीयांची मोठी गर्दी होत असून, बुधवारी सायंकाळच्या सुमारास बसस्थानकासमोर कार पार्किंगमुळे तब्बल पाऊण तास वाहतूक कोंडी झाली. 

जावली ब्रिजपासून कणकवली बसस्थानकापर्यंतच्या सर्व्हिस रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एसटी बस तसेच खासगी बसेसना मार्ग काढताना मोठी अडचण निर्माण झाली. चौकाचौकात पोलीस आणि होमगार्ड तैनात असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी आणि गणेशभक्त दाखल झाले आहेत. उद्या गौरी आवाहन असल्याने शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अनेकजण मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्क करून खरेदीसाठी जात असल्याने रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

विशेषतः बसस्थानक परिसर आणि सर्व्हिस रोडवर पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनांना रस्त्यावरून मार्ग काढण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक नियोजन अधिक प्रभावी करण्याची गरज निर्माण झाली असून, बेशिस्त पार्किंगवर कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.