LIVE UPDATES

रायगडमध्ये पावसाचा कहर

नद्या धोक्याच्या पातळीवर, जनजीवन विस्कळीत
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 05, 2026 17:25 PM
views 40  views
#kokansadlive#news update#konkan update#

नद्या धोक्याच्या पातळीवर, जनजीवन विस्कळीत

रायगड : जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, जिल्ह्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.सततच्या पावसामुळे अंबा, सावित्री आणि कुंडलिका या प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, माणगाव, तळा, रोहा आणि अलिबाग तालुक्यातील काही आदिवासी पाड्यांमध्ये झोपड्या कोसळल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र बाधित कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.रोहा तालुक्यातील भिसे खिंड येथे दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून रस्ता सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील तीन तासांत नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.