LIVE UPDATES

तिलारी प्रकल्पाच्या मायनर कालव्याला वायंगणतड येथे गळती

शेती , बागायतीत घुसले पाणी
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 05, 2026 18:23 PM
views 60  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग :-

       तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या वायंगणतड येथील मायनर कालव्याला लागलेल्या गळतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती, नारळ, सुपारी बागायतीत  मोठ्या प्रमाणात कालव्याचे पाणी शिरल्याने येथील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कालव्यातील पाणी थेट भातशेती व बागायतींमध्ये शिरत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी न फिरकल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वायंगणतड येथे तिलारी प्रकल्पाचा मायनर कालवा आहे. या मायनर कालव्याला पडलेल्या गळतीमुळे परिसरातील भातशेती, बागायती आणि अन्य लागवडीच्या क्षेत्रात तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले आहे. सतत पाणी साचत असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.गळती सुरू झाल्यानंतर ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी तातडीने तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. गळती वाढत असून तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचेही वारंवार सांगण्यात आले. मात्र, तीन दिवस उलटूनही संबंधित विभागाचा एकही अधिकारी घटनास्थळी न आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कार्यालयात बसून कारभार चालतो, शेतकऱ्यांच्या बांधावर येण्यास वेळ नाही का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत शेतकरी व ग्रामस्थांनी शनिवारी येथील कार्यालयाला धडक दिली. मात्र, सुट्टी असल्याने कार्यालयात कोणीही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागले.

शेतकऱ्यांनाच भुर्दंड का?

  कालव्याला गळती लागल्यानंतर तातडीने उपाययोजना केल्या असत्या, तर नुकसान टाळता आले असते. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गळती वाढत गेली आणि पाणी थेट शेतीत घुसल्याने अनेक बागायती आणि पिके धोक्यात आली आहेत. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सिंचन योजनेची देखभाल वेळेत होत नसेल, तर त्याचा फटका शेतकऱ्यांनी का सहन करावा? असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

.... अन्यथा आंदोलन

      कालव्याची गळती तातडीने बंद करून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करावेत. तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून मायनर कालव्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घ्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला आहे.