
कुडाळ : येथील कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आजपासून उत्कर्ष फाउंडेशन,अलिबाग आयोजित SAP BASIS प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून यामध्ये राज्यातून ८ तर विजयवाडा-आंध्रप्रदेश मधून एक असे एकूण नऊ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. हे प्रशिक्षण ३ महिने चालणार असून, प्रशिक्षण यशस्वी यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांनी उत्कर्ष फाउंडेशन, अलिबाग यांच्याशी ऑक्टोबर २०२४ पासून SAP ABAP आणि SAP FICO या अभ्यासक्रमांच्या मोफत प्रशिक्षण व प्लेसमेंटसाठी सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत तीन बॅचेस यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून प्रशिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल प्रतिसादामुळे व यशस्वी प्लेसमेंटमुळे हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला आहे.याच यशस्वी वाटचालीचा पुढचा टप्पा म्हणून उत्कर्ष फाउंडेशन तर्फे आजपासून म्हणजेच जुलै २०२६ पासून पहिल्यांदाच SAP BASIS या नवीन विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे, कमशीप्र मंडळाचे सहाय्यक सचिव महेंद्र गवस, उत्कर्ष फाउंडेशन अलिबागचे अध्यक्ष दिलेंद्र शिरढणकर, तसेच आरसीएफचे युनिट लीडर संतोष म्हात्रे, अनुज म्हात्रे, गौतम कोलपे, नीती जागी हे सर्वजण टेकविट, मुंबई कंपनी मार्फत उपस्थित होते. तसेच प्रा. प्रशांत केरवडेकर, डॉ. एस के. पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी या उपक्रमाबद्दल उत्कर्ष फाउंडेशनचे आभार मानले. ऑक्टोबर २०२५ मध्ये SAP ABAP व SAP FICO या अभ्यासक्रमांसाठी २५ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यातील १३ जणांना जॉब मिळाला. त्यातही काही जणांना संत राऊळ महाराज महाविद्यालयातच नोकरी मिळाली. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हयातील विद्याथ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सुरवसे याणी केले.
उत्कर्ष फाउंडेशन अलिबागचे अध्यक्ष दिलेंद्र शिरढणकर म्हणाले, हि आमची सातवी बॅच आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून प्लेसमेंट मिळविली आहे. पूर्ण सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे आभार मानले. हे महाविद्यलाय फक्त प्रशिक्षणासाठी जागा देऊन थांबत नाही तर विद्यार्थ्यां चांगला जॉब मिळावा यासाठी देखील हे महाविद्यालय सक्रिय प्रयत्न करते, असे सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून दिली. त्या सर्व विद्यार्थ्यांना उत्कर्ष फाउंडेशन अलिबागचे अध्यक्ष दिलेंद्र शिरढणकर यांनी मार्गदर्शन केल. यावेळी आरसीएफचे युनिट लीडर संतोष म्हात्रे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
SAP ही जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये वापरली जाणारी व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली आहे. या प्रणालीचे सुरळीत संचालन, देखभाल, सुरक्षा, सर्व्हर व्यवस्थापन आणि तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्याचे काम SAP BASIS तज्ज्ञांकडून केले जाते. एखाद्या मोठ्या इमारतीच्या व्यवस्थापनासाठी जसा देखभाल अभियंता आवश्यक असतो, त्याचप्रमाणे SAP प्रणाली सुरळीत चालण्यासाठी SAP BASIS व्यावसायिकांची आवश्यकता असते. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असून आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.या प्रशिक्षणामध्ये SAP प्रणालीची मूलभूत माहिती, सर्व्हर व्यवस्थापन, सिस्टम मॉनिटरिंग, युजर ऍडमिनिस्ट्रेटेशन, बॅकअप व सिक्युरिटी यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी महिती आयोजकांनी दिली.










