
सिंधुदुर्ग : कोकणची कला म्हणून ओळख असलेल्या 'दशावतार कलावंतांना न्याय द्यावा' अशी बातमी 'कोकणसाद'च्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती. या बातमीची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेत जिल्ह्यातील दशावतार कलावंतांना बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली. कलावंतांच्या मागण्या समजून घेत राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्यासह नाट्य पोशाखासाठीचा निधी, वृद्ध कलावंतांच्या मानधन कोट्यात वाढ करून देण्याचा शब्द पालकमंत्री नितेश राणेंनी दशावतार कलावंतांना दिला.
कणकवली येथील कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. यावेळी दशावतार कलावंतांच्या मागण्यांबाबत सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री श्री. राणेंनी दिले. तसेच सिंधुरत्न योजनेतून कलाकारांच्या नाटकातील पोशाखासाठी निधी देण्याची तजवीज करून देण्यासह वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठीचा कोटा वाढवून देण्याचा शब्द पालकमंत्री श्री. राणेंनी दिला. यावेळी दशावतार कलावंतांनी मंत्री नितेश राणेंचे तसेच 'कलावंतांना न्याया द्यावा' ही बातमी प्रसारित केल्याबद्दल कोकणसादचे आभार मानले. पालकमंत्र्यांनी शब्द दिल्याने या कलावंतांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार कलाकार संघाचे सचिव चारूहास मांजरेकर, ज्येष्ठ दशावतार कलावंत उल्हास नाईक, सुभाष लोंढे, बाबा मयेकर, शिवा मेस्त्री, दत्तप्रसाद शेणई गुरू मेस्त्री, सुरेश गुरव, मामा माळकर, सुधीर तांडेल, उदय मोर्ये, राजन बांदेकर, नितीन घाडीगांवकर, दिलीप सामंत, गोट्या येरागी, विनोद परब, संजय लाड, दिवा मेस्त्री, सुयश ठाकूर, संदेश वेंगुर्लेकर आदी जिल्ह्यातील दशावतार कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकणची समृद्ध ओळख आणि सुमारे ८०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या दशावतार लोककलेचे जतन करणाऱ्या कलावंतांना शासनाचा खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान २००० आणि मुंबई व उपनगरात २०५ कलाकार सद्यस्थितीत दशावतार नाट्यप्रयोग सादर करून कोकणची संस्कृती जिवंत ठेवत आहेत. या कलाकारांची आज मोठी परवड होत आहे. वृद्ध कलाकार मानधन वगळता, सांस्कृतिक मंत्रालयाकडून कार्यरत असणाऱ्या कलाकारांना 'कला व कलाकार संवर्धन' नावाखाली मिळणाऱ्या अनुदानाचा एकही रुपया प्रत्यक्ष कलावंतांपर्यंत पोहोचत नाही. दशावतार कलाकार कोणत्याही मंडळाचा कायमस्वरूपी नोंदणीकृत सदस्य नसून तो मजुरी तत्त्वावर काम करतो. त्याची शासन दरबारी कुठेही नोंद नाही. त्यामुळे शासनाने त्यांची नोंद करून अधिकृत ओळखपत्र द्यावे, दशावतारी वेशभूषेसाठी 'डीबीटी' प्रणालीद्वारे हा वस्त्र निधी थेट कलाकाराच्या बँक खात्यात जमा करावा, लोककला अनुदान शिफारस समितीवर केवळ मंडळाचे मालक किंवा चालकांची निवड झाली. ज्यामुळे सर्वसामान्य कलाकारांचा वाटा गायब होतो. यापुढे या समितीवर प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या कलाकारांची निवड व्हावी. वृद्ध कलाकार मानधन समितीवर तत्सम वयाच्या दशावतार कलाकाराची नियुक्ती करण्यात यावी, कलाकारांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने त्यांना हेल्थ इन्शुरन्स व अपघाती विमा संरक्षण द्यावे, वृद्ध कलाकार मानधन योजनेअंतर्गत लाभार्थी यादी वाढवावी. तसेच निवृत्त न्यायाधीश किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून सर्व दशावतार मंडळांची फेर तपासणी करावी व शासन दरबारी त्यांची अधिकृत नोंद करावी आदी मागण्या उपस्थितांकडून यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी कलावंतांना न्याय मिळवून देण्याचा शब्द राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला










