
कुडाळ :
येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीवर आज सकाळी अचानक एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र रुग्णालय परिसरामध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच कुडाळ नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी अत्यंत तत्परता दाखवत तातडीने दखल घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने नगर पंचायतीच्या कर्मचारी पथकाला घटनास्थळी रवाना केले.नगराध्यक्षा बांदेकर यांनी कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर काम करून इमारतीवर पडलेले झाड कापून व तिथून पूर्णपणे हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यानुसार नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून सध्या झाड तोडण्याचे आणि रस्ता व इमारत परिसर मोकळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नगराध्यक्षांच्या या तत्पर भूमिकेमुळे रुग्णालयातील रुग्ण आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला असून, त्यांच्या या त्वरित कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.










