LIVE UPDATES

Dodamarg News : घोटगे येथे वाघाचा गुरांच्या कळपावर हल्ला

वासराचा मृत्यू : शेतकरी थोडक्यात बचावला
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 26, 2026 19:21 PM
views 30  views

दोडामार्ग : घोटगे येथे वाघाने वासराचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. गुरे घरी घेऊन जात असताना झालेल्या या हल्ल्यात शेतकरी पांडुरंग दळवी हे सुदैवाने बचावले. या घटनेमुळे घोटगे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पांडुरंग दळवी हे बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आपली गुरे चरवून घराकडे घेऊन जात होते. यावेळी अचानक वाघाने गुरांच्या कळपावर झडप घातली. या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाला. वाघाच्या अचानक हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, घोटगे व परिसरात सुरू असलेली जंगलतोड आणि डोंगर उत्खननामुळे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. 

हत्ती, गवा आणि वाघ यांसारखे वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ येत असल्याने वन्यजीव-मानव संघर्षाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने परिसरात गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वासराच्या नुकसानीची शासनाकडून नियमानुसार भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.