LIVE UPDATES

दोडामार्गात वाढीव वीज बिलांच्या तक्रारीवरुन संतोष नानचेंचा महावितरणला जाब

माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे उपकार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 26, 2026 19:11 PM
views 19  views

दोडामार्ग : दोडामार्ग मधील महावितरणच्या कारभारामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप दोडामार्ग नगरसेवक संतोष नानचे यांनी केला. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत असून, सोलर लाईटची सुविधा उपलब्ध असतानाही काही ग्राहकांना तब्बल दहा हजार रुपयांपर्यंतची वीज बिले येत असल्याचे त्यांनी महावितरणच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आपण सर्व माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंखे यांनी उपस्थितांना दिले.

शुक्रवारी सकाळी नगरसेवक संतोष नानचे यांनी येथील महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंखे यांची भेट घेऊन विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शहरातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. सोबत शैलेश गोवेकर, सागर नाईक, फोंडू हाडिकर, पांचाळ उपस्थित होत

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर काही ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये अनपेक्षित वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः सोलर लाईट बसविल्यानंतरही हजारो रुपयांची बिले येत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या प्रकाराची वस्तुनिष्ठ चौकशी करून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी नानचे यांनी केली. तसेच ग्राहकांकडे वीज जोडणीसाठी आवश्यक डिपॉझिटची रक्कम जमा असतानाही त्यांच्याकडून पुन्हा पैसे घेतले जात असल्याचा आरोपही नानचे यांनी केला.

महावितरणच्या विविध प्रक्रियांमध्ये ग्राहकांना नेमक्या कोणत्या कारणासाठी शुल्क आकारले जाते? याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहरातील धाटवाडी परिसरातील वीज चोरीच्या प्रकरणाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. संबंधित प्रकरणात महावितरणने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली? याची माहिती नानचे यांनी उपकार्यकारी अभियंता साळुंखे यांच्याकडे मागितली. वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये नियमानुसार कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नगरसेवक नानचे यांनी मांडलेल्या विविध तक्रारी व मुद्द्यांची दखल घेत उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब साळुंखे यांनी संबंधित बाबींची सर्व माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल, तसेच चौकशीनंतर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शिवाय वीजचोरीवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केल्याचे भाऊसाहेब साळुंखे यांनी उपस्थितांना सांगितले.