
सावंतवाडी : नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांत दोन गट असून अंतर्गत राजकारणातून पाणी पुरवठा सभापतींचे नाव घेण्यासाठी टीप दिली गेली असा गौप्यस्फोट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर यांनी केला. तर समितीचा सदस्य म्हणून आम्ही हा घोटाळा होण्यापासून रोखल्याचे सांगत या घोटाळ्यास जबाबदार दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर उपस्थित होते.
नगरसेवक श्री. टेमकर म्हणाले, सत्ताधाऱ्यांतील गटबाजीचा परिणाम शहरातील विकास कामावर होत आहे. यातच नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील १७ लाखांचा घोटाळा झाला असून समिती सदस्य म्हणून तो होण्याआधी आम्ही रोखला. यातील चौकशीत जोडारी दोषी आढळला असून इतरही लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या पाठीमागे कोण आहे ? याचाही शोध लावावा. जोडारी अन् सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही मागणी केली आहे.
दरम्यान, याची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही नगराध्यक्ष व सभापतींकडे केली होती. मुख्याधिकारी यांच्याकडून देखील बील काढण्यासाठी दबाव केला जात होता. मात्र, आम्ही आक्षेप घेतल्यानंतरच बील अदा करण्यात आले नाही. तसेच या प्रकरणात सभापतींच नाव घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडूनच टीप दिली आहे असा गौप्यस्फोट करत या घोटाळ्यात सामील असलेल्या लोकांवर कारवाई व्हावी अशी मागणी श्री. टेमकर यांनी केली आहे.










