
सिंधुदुर्गनगरी : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान (RGSA) अंतर्गत २० ते २२ जुलै २०२६ या कालावधीत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय क्षमता बांधणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्रितपणे या प्रशिक्षणात सहभाग नोंदवून नवा आदर्श निर्माण केला.
प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी यशदाचे महासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित सदस्यांशी संवाद साधत लोकाभिमुख, पारदर्शक आणि प्रभावी प्रशासनासाठी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच सत्र संचालिका रेश्मा होजगे उपस्थित होत्या. या प्रशिक्षणात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, वित्त व बांधकाम समितीचे सभापती संतोष साटविलकर, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती प्रीतेश राऊळ, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नारकर, समाजकल्याण समितीच्या सभापती रुहिता तांबे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्रशिक्षणादरम्यान पंचायत राज व्यवस्थेचा इतिहास, ७३ वी घटनादुरुस्ती, ग्रामविकास योजना, शाश्वत विकास ध्येय (SDGs), मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, जिल्हा परिषद अंदाजपत्रक, वित्तीय अधिकार, लेखासंहिता, खरेदी प्रक्रिया, नेतृत्व विकास, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS), तसेच DPDP, BPDP आणि GPDP विकास आराखड्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय मतदारसंघनिहाय विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया, जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, सभा कामकाज, प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रभावी वापर तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती सदस्यांना देण्यात आली. प्रशिक्षकांनी विविध विषयांवरील शंकांचे समाधान करत लोकप्रतिनिधींना अधिक सक्षम आणि परिणामकारक कार्यपद्धतीची दिशा दिली.
या प्रशिक्षणामुळे जिल्हा परिषद सदस्यांची प्रशासकीय समज, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टी अधिक व्यापक होणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणाला आणि गावांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच नवी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.










