LIVE UPDATES

जानवलीतील दत्त मंदिरात चोरी

Edited by:
Published on: July 05, 2025 21:11 PM
views 157  views

कणकवली : जानवली येथील कृष्णनगरी येथील ओमकार मोहिते यांच्या घरासमोरील श्री स्वयंभू दत्त मंदिर चोरट्यांनी फोडून ५००० रु. किंमतीची पंचधातूची मूर्ती चोरली. ही घटना शनिवारी मध्यरात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सीसीटीव्हीला कनेक्ट असलेल्या सायरन वाजल्यानंतर चोरट्यांनी कटावणी व पिस्तूल टाकून त्याठिकाणी धूम ठोकली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. 

कृष्णनगरी येथे मोहिते यांचे घर आहे. घरासमोर श्री स्वयंभू दत्त मंदिर आहे. हे मंदिर २०१९ मध्ये बांधण्यात आले आहे. हे मंदिर मोहिते यांच्या खासगी मालकीचे आहे. घरातील एका खोलीतील जमिनीत ही मूर्ती मिळल्याचा दावा, मोहिते यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना करून श्री स्वयंभू दत्त मंदिराची उभारणी केली आहे. मंदिरात भाविकांची दर्शनासाठी नेहमीच ये-जा असते. गुरुवार ३ जुलै रोजी या मंदिराजवळ चौघे तरुण आले होते. यातील एकाने मोहिते यांना मला आपण ओखळले का असे विचारले होते. त्यानंतर मंदिरात दत्ताचे दर्शन घेतले. याठिकाणचे व्हिडिओ शूटिंग देखील केले. त्यानंतर मूर्ती सोन्याची आहे, अशी विचारणा त्यांनी केली होती, असे मोहिते यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री मोहिते यांनी मंदिराला कुलूप लावून झोपी गेले. ही संधी साधत शनिवारी मध्यरात्री चोरटे त्याठिकाणी दाखल झाले. कटावणीच्या सहाय्याने मंदिराचा दरवाजाच्या कडीकोयंडा तोडला. त्यानंतर मंदिरातील पंचधातूची मूर्ती लंपास केली. त्याचवेळी सीसीटीव्ही कनेक्ट असलेला सायरन वाजल्याने चोरट्यांनी घराचा पुढील व मागील दरवाजाचा कडी लावून आणि कटावणी, पिस्तूल त्याठिकाणी टाकून धूम ठोकली. मंदिरात चोरी झाल्याची माहिती मोहिते यांनी पोलिसांनी दिली.

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह पांडुरंग पांढरे, विनोद चव्हाण, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, प्रमोद काळसेकर यांना घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर ठसे तज्ज्ञ व श्वान पथक दाखल झाले. ठसे तज्ज्ञांनी या परिसराची तपासणी करत काही पुरावे गोळा केले आहेत. याठिकाणी पोलिसांना कटावणी व पिस्तूल, पाच बंदुकीच्या गोळ्या सापडल्या आहेत. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, मंदिराचा फोडाताना चोरटे सीसीटीव्ही कैद झाले असून ३ जुलै रोजी दर्शनासाठी आलेले भाविक आणि चोरट्यांमध्ये साधर्म्य आहे, असे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले. तपास श्री. जाधव करीत आहेत.