LIVE UPDATES

कुडाळ पावसाची जोरदार बॅटिंग

Edited by:
Published on: July 03, 2025 20:26 PM
views 315  views

कुडाळ :  सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली. गुरुवारीही सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रमुख नद्या तसेच ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यालाही बुधवारी संध्याकाळपासूनच पावसाने अक्षरशः झोडपून काढले. कुडाळ तालुक्याच्या माणगाव खोऱ्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे भंगसाळ नदीला पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे कुडाळ शहरात पाणी घुसले.  मुंबई_गोवा महामार्गावरून काळपनाका, गुलमोहोर हॉटेल या दरम्यान रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे कुडाळ शहरात जाण्यासाठी अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब नागरिकांना करावा लागला. 

कुडाळ शहर ते रेल्वे स्टेशन मार्ग बंद :

मुसळधार पावसामुळे कुडाळ शहर ते बाव या मार्गावर पाणी साचले. त्यामुळे कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद राहिला. यामुळे रेल्वे प्रवासासाठी जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. त्यांना कुडाळ रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी नाबरवाडी मार्गे  जावे लागले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील घरात घुसले पाणी :

मुसळधार पावसाचा फटका कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरातील घरांना बसला. या भागातील दहा ते बारा घरांमध्ये पाणी गेल्याने येथील नागरिकांना सुरक्षेच्या ठिकाणी हलविण्यात आले. तर या भागात सुरक्षेच्या दृष्टीने तहसीलदार तसेच कुडाळ पोलिसांनी आढावा घेतला. 

पावशी शेलटेवाडीत पुराचे पाणी:

भंगसाळ नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या पावशी शेलटेवाडी भागातही काही घरांमध्ये पुराचे पाणी गेले. यामुळे तेथील स्थानिक लोकांना स्थलांतरित होण्याचा आदेश देण्यात आला.  वेताळ बांबर्डे भागातही हातेरी नदीवर पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे वेताळ बांबर्डे आणि  पणदूर गावचा संपर्क काही प्रमाणात तुटला. वेताळ बांबर्डे मांगल्य मंगल कार्यालय येथे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे येथील घरांना सुरक्षा दृष्टीने काही भागात स्थलांतरित करण्यात आले.