
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताकडून यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा आणि शुबमन गिल यांनी दमदार कामगिरी केली. ज्यामुळे भारतीय संघाने 587 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात संघाने 427 धावा केल्या.
भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 1000 पेक्षा जास्त धावा केल्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीही टीम इंडियाने कसोटी सामन्यात एकूण 1000 पेक्षा जास्त धावा केल्याचे घडले नव्हते. आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात भारतीय संघाने एकूण 1014 धावा केल्या आहेत.
भारतीय संघासाठी कर्णधार शुबमन गिलने पहिल्या डावात द्विशतक झळकावले. त्याने संपूर्ण मैदानावर फटके मारले आणि भारतीय कसोटी कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने एकूण 269 धावा केल्या. त्याच्याशिवाय यशस्वी जयस्वालने 87 धावा आणि रवींद्र जडेजाने 89 धावा केल्या. शेवटी वॉशिंग्टन सुंदरनेही 42 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच भारतीय संघ पहिल्या डावात 587 धावा करू शकला.
यानंतर, दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी त्यांची दमदार कामगिरी सुरू ठेवली. शुबमन गिलने दुसऱ्या डावात 161 धावा केल्या. यासह, तो एकाच कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक झळकावणारा दुसरा भारतीय ठरला. त्याच्या आधी सुनील गावस्कर यांनी हे केले होते. त्याच्याशिवाय रिषभ पंतने 65 धावा केल्या. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजानेही अर्धशतक झळकावले. त्याने 69 धावांची खेळी केली. केएल राहुलने 55 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया दुसऱ्या डावात 427 धावा करू शकली. यानंतर, भारताने इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचे लक्ष्य दिले आहे.
प्रत्युत्तरात, चौथ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडच्या संघाने 3 गडी गमावून 72 धावा केल्या आहेत. आतापर्यंत भारताकडून मोहम्मद सिराजने एक आणि आकाश दीपने दोन गडी बाद केले आहेत.