
कुडाळ : मराठी भाषेच्या अस्मितेसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे १८ वर्षानंतर व्यासपीठावर एकत्र आल्याने शनिवारी सायंकाळी कुडाळ येथे शिवसेना ( ठाकरे गट) पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी फटाके वाजवुन जल्लोष करीत आनंद व्यक्त केला. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणाही दिल्या.
राज्य सरकारने हिंदी सक्तीचे परिपत्रक मागे घेतल्यावर मराठी माणसांचा विजय म्हणून वरळी - मुबई येथे आज उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. मराठीच्या मुद्द्यासाठी ठाकरे बंधू तब्बल १८ वर्षांनी व्यासपीठावर एकत्र आले. दोघांनीही दमदार भाषणे केली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा आनंद मराठी माणसाबरोबर शिवसेना (ठाकरे गट ) पदाधिकाऱ्यांना झाला. कुडाळ येथील शिवसेना कार्यालयासमोर कुडाळ तालुक्यातील या पक्षाच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आवाज कुणाचा शिवसेनेचा, मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असो, उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही या कार्यकर्त्यांनी दिल्या.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, जिल्हा परिषद माजी सदस्य नागेंद्र परब, अतुल बंगे, गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे, रुपेश वाडयेकर श्यामा परब, तेडोली सरपंच अनघा तेंडुलकर, बाळू पालव, मंगेश बांदेकर, राजन खोबरेकर, नरेंद्र राणे, गोट्या चव्हाण यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.