LIVE UPDATES

'ताज' हॉटेलमुळे शिरोडा आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन बनेल

माजी मंत्री आमदार दीपक केसरकर : मी कामाची फारशी प्रसिद्धी करत नाही
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 20:16 PM
views 29  views

सावंतवाडी : ताज पंचतारांकित हॉटेलमुळे शिरोडा आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन बनेल असा विश्वास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. काल याचा त्रिपक्षीय करार झाला असून  एमटीडीसी, स्थानिक समिती आणि ताज यांच्यामध्ये हा करार झालेला आहे अशी माहिती आमदार केसरकर यांनी दिली. 

ते म्हणाले, ताजने ६० कोटी रुपये मंजूर केले होते. त्याचे डिस्ट्रीब्युशन कुठल्या लोकांना करावं आणि ते काय प्रमाणात करावं, या संदर्भातला तो करार आहे. ६० कोटीची रक्कम त्यांनी दोन वर्षापूर्वीच मंजूर केलेली होती. दोन वर्षापूर्वी गिरीश महाजन हे पर्यटन खात्याचे मंत्री होते त्यावेळेला त्यांनी रिन्युअल दिलेलं होतं. भूमीपूजन सुद्धा केलेलं होतं. त्याच्यामुळे ही दोन वर्ष मध्ये गेली नसती, तर दोन वर्षात एवढ्यात तो प्रोजेक्ट उभा राहिला असता. त्याच्या परवानग्या सुद्धा दोन वर्षापूर्वी मी ग्रामपंचायतीसह सरकारी परवानग्या आणून दिलेल्या होत्या.

परंतु, एका छोट्याशा गोष्टीसाठी दोन वर्ष गेली. मात्र, पालकमंत्री नितेश राणे आणि पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न करून त्रिपक्षीय करार केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे हा त्रिपक्षीय करार झाल्यामुळे लोकांना पैसे वाटप व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे प्रकल्पाचं काम सुद्धा सुरू होईल. आर्किला हे बुटीक हॉटेल असून त्याच्यामध्ये रूम्सची संख्या ३० ची आहे. ताजचा प्रकल्पात जवळजवळ १४२ पहिल्या टप्प्यामध्ये रूम्स असणार आहेत.

आर्किलामध्ये सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये साधारण ५०० ते १००० रूम्स करण्याची तरतूद आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच हे प्रकल्प सुरू झाल्यामुळे आता पर्यटनाला एक वेगळी दिशा मिळेल आणि 'ताज' हे आंतरराष्ट्रीय नाव आहे. त्याच्यामुळे शिरोडा हे आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन बनेल. यातील अडचणी आज दूर झालेल्या असून अनेक प्रकल्प याठिकाणी येऊ घातलेले आहेत. लवकरच लोकांना हे दिसतील. मी काम करतो परंतु, फारशी प्रसिद्धी करत नाही. ज्यांनी हे काम केलं त्यांनाच ते श्रेय मिळालं पाहिजे. हा  करार करण्याचं काम हे पालकमंत्र्यांच्या काळात झालय त्यांनाच ते श्रेय मिळालं पाहिजे व शंभूराज देसाईंना सुद्धा मिळालं पाहिजे. माझं काम मी दोन वर्षापूर्वीच पूर्ण केलेलं आहे अशी भावना श्री. केसरकर यांनी व्यक्त केली.