LIVE UPDATES

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आजच्या पिढीला दिशादर्शक- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा; 'वाटचाल' पुस्तिकेचे प्रकाशन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 26, 2026 15:55 PM
views 34  views

सिंधुदुर्गनगरी : सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या संकल्पना केवळ विचारांपुरत्या मर्यादित न ठेवता त्या प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात कृतीत उतरविल्या पाहिजेत. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून दिला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. बहुजन उद्धारक, शिक्षणाला प्राधान्य देणारे, सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देणारे आणि आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य आजही प्रेरणादायी असून त्यांचे विचार आजच्या पिढीला दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धोरणानुसार जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती तथा सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. 

 यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते समाज कल्याण कार्यालयाच्या 'वाटचाल' या माहितीपर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त विशाल नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आणि समतादूत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना 'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत सामूहिक शपथ देण्यात आली. त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची समकालीन प्रासंगिकता' या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. शाहू महाराजांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात केलेल्या दूरदृष्टीपूर्ण सुधारणांचा आढावा घेत त्यांनी सांगितले की, शाहू महाराज हे केवळ राजे नव्हते, तर ते रयतेचे खरे राजे आणि सामाजिक समतेचे दूत होते. त्यांनी घेतलेले शैक्षणिक निर्णय आणि आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा ही आधुनिक भारताच्या सामाजिक न्याय व्यवस्थेचा भक्कम पाया ठरली आहे असेही ते यावेळी म्हणाले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले, तर विशेष अधिकारी तुषार गवळी यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.