
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मासिक सभेत शहरातील बॅनरबाजी, अतिक्रमणे, रखडलेली विकासकामे, कचरा व्यवस्थापन, वॉटर एटीएम प्रकल्प आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार चर्चा रंगली. नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात ही सभा संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्षा मिताली सावंत, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक नितीन बांदेकर यांनी शहरात मोठ्या प्रमाणात लावल्या जाणाऱ्या शुभेच्छा फलक, जाहिरात फलक आणि विविध बॅनरमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अशा बॅनरांना नगरपंचायतीची परवानगी घेतली जाते का, परवानगीची मुदत किती असते, तसेच परवानगी घेतल्यास त्यासंदर्भातील क्यूआर कोड अथवा स्कॅनर का लावला जात नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अपघातप्रवण क्षेत्रात बॅनर न लावण्याचे नियम असताना अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींचे शुभेच्छा फलक झळकत असल्याबाबतही त्यांनी प्रशासनाकडे जाब विचारला.
यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेत नगरपंचायत क्षेत्रात यापुढे परवानगीशिवाय बॅनरबाजी होऊ दिली जाणार नाही. नियमबाह्य पद्धतीने फलक अथवा बॅनर लावल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक नितीन बांदेकर यांनी नगरपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकास कामांबाबतही प्रश्न उपस्थित केले. पाच लाख रुपयांच्या निधीतून होत असलेल्या कामांची माहिती लोकप्रतिनिधींना मिळत नसल्याची खंत व्यक्त करत प्रशासन व कर्मचारी यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी एकाच कामाची वेगवेगळ्या नावाने नोंद होत असल्याचा आरोप करत अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नगरपंचायतीच्या सभेतील चर्चेच्या नोंदींमध्ये काही शब्द किंवा मुद्दे गाळले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. प्रशासनाकडून चुकीची माहिती देऊन लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात असल्याने ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सभेत नगरसेवक नितीन बांदेकर आणि स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांनी वॉटर एटीएम प्रकल्पाचाही मुद्दा उपस्थित केला.
नगरपंचायतीची मालकी नसलेल्या जागेवर लाखो रुपये खर्च करून वॉटर एटीएम उभारण्यात आले, मात्र ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. जागा नगरपंचायतीची नसताना त्यावर खर्च कसा करण्यात आला आणि यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांनी कमी दरात प्लास्टिक कचरा संकलन करणाऱ्या एका एजन्सीचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला. यावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी नगरसेवक आणि ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक विशाल मांजरेकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनीही यासंदर्भात भूमिका मांडताना कचरा व्यवस्थापनासाठी दिलेल्या जागेची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी केली.
यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी देवगडमधील कचऱ्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगत केवळ वाद घालून प्रश्न सुटणार नाहीत, तर सर्वांनी मिळून ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी नितीन बांदेकर यांनीदेखील पूर्वी कचरा व्यवस्थापनासाठी मांडलेल्या योजनांना विरोध झाला नसता तर हा प्रश्न त्याचवेळी मार्गी लागला असता, असे मत व्यक्त केले. सभेत शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबतही सविस्तर चर्चा झाली. पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी नळयोजनेद्वारे शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची सुरु असलेल्या कामाची माहिती दिली.











