LIVE UPDATES

सीसीटीव्हीच्या कडेकोट निगराणीखाली 'महाटीईटी'

४,११२ उमेदवारांचे फिंगरप्रिंट, फेस स्कॅनिंग अन् बायोमेट्रिक तपासणी!
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 26, 2026 15:45 PM
views 68  views

सिंधुदुर्गनगरी : भावी शिक्षकांच्या पात्रतेची कसोटी ठरणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) येत्या २८ जून रोजी जिल्ह्यात अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी यंदा प्रथमच प्रत्येक उमेदवाराचे फिंगरप्रिंट, फेस स्कॅनिंग, बायोमेट्रिक पडताळणी केली जाणार असून प्रत्येक परीक्षा कक्ष सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे. जिल्ह्यातील ४,११२ उमेदवार या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

राज्यातील ३७ जिल्हा मुख्यालयांतील १,७२९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दोन सत्रांत होणार असून यंदा राज्यभरातून ६ लाख १२५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर युनिक क्रमांक आणि बारकोड देण्यात आल्याने गैरप्रकारांना आळा बसणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता परब यांनी दिली.

जिल्ह्यात ४,११२ उमेदवार मैदानात- सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेपर-१ साठी १,९०३ तर पेपर-२ साठी २,२०९ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.

२०५ अधिकारी-कर्मचारी तैनात- परीक्षेसाठी जिल्ह्यात ३ झोनल अधिकारी, ११ केंद्र संचालक, ११ सहाय्यक पर्यवेक्षक आणि १८५ समवेक्षक अशी सुमारे २०५ जणांची यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही- जिल्ह्यातील १८५ वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक वर्गात २४ उमेदवारांमागे एक समवेक्षक नियुक्त करण्यात आला असून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.

फिंगरप्रिंट, फेस स्कॅनिंग अन् मेटल डिटेक्टरची तपासणी- जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उमेदवारांची फेस रेकग्निशन, बायोमेट्रिक पडताळणी, फिंगरप्रिंट नोंदणी, मेटल डिटेक्टरद्वारे फ्रिस्किंग करण्यात येणार आहे. तसेच सर्व केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दोन सत्रांत परीक्षा-

  • पेपर-१: सकाळी १०.३० ते १.००
  • पेपर-२: दुपारी २.३० ते ५.००

उमेदवारांनी सोबत ठेवावीत ही कागदपत्रे-

  • प्रवेशपत्र
  • मूळ आधार कार्ड / पॅनकार्ड / वाहन परवाना / मतदान ओळखपत्र (यापैकी एक)
  • दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

या वस्तूंना सक्त मनाई

  • मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे
  • डिजिटल गॅझेट्स
  • चेहरा झाकणारे कपडे किंवा मास्क

प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता परब यांनी उमेदवारांना वेळेआधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.