LIVE UPDATES

होडावडेच्या विद्यार्थिनींनी पाठवलेल्या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचल्या

‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 30, 2026 18:18 PM
views 404  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

वेंगुर्ला : तालुक्यातील होडावडा केंद्रशाळेतील विद्यर्थिनी, शिक्षक, पालक यांनी राबविलेल्या ‘एक राखी सैनिकांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी देशाच्या सीमेवर तैनात राहून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी प्रेमाने राख्या तयार करून पोस्टाद्वारे पाठविल्या होत्या. या राख्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली येथील सैनिकांपर्यंत पोहोचल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

होडावडा केंद्रशाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविला. विद्यार्थिनींनी पाठविलेल्या राख्या बिरपूर, दिल्ली येथील सैनिकांपर्यंत पोहोचल्या असून, जे. एस. बाळकृष्ण यांनी या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष सहकार्य केले.

पालक आर्या आशिष नाईक यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम साकारण्यात आला. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तथा माजी सरपंच अदिती नाईक, उपाध्यक्षा सुचिता पेडणेकर, सदस्य मंजिरी तांडेल, नंदिनी कामत, समिक्षा चव्हाण, हर्षिता नाईक, सोनिया चौगुले तसेच मुख्याध्यापिका श्रीमती मकराने आणि शिक्षक श्री. लोंढे, श्री. सर्वदे व श्री. शेळके यांनी मोलाचे सहकार्य केले.

देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सैनिकांप्रती विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.