
कुडाळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत SIR मोहिमेवर भर
कुडाळ : "मतदार यादी पुनर्निरिक्षण (एस.आय.आर.) अभियानांतर्गत शिवसेनेच्या बीएलए (BLA) यांनी आपल्या बुथवरील मतदारांच्या नोंदणीची कसून पडताळणी करावी. कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची दक्षता घ्या," असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी, तेंडोली, ओरोस, वेताळबांबर्डे आणि पावशी या जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.
वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "शासकीय बीएलओ (BLO) यांच्यासोबत समन्वय ठेवून प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचा. जर यादीत बोगस नावे असतील, तर ती बीएलओंच्या निदर्शनास आणून वगळण्याची कार्यवाही करा. संघटनात्मक बळकटीकरणासाठी बीएलए यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करा."
या बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर आणि युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर यांच्यासह पिंगुळी, तेंडोली, ओरोस, वेताळबांबर्डे आणि पावशी विभागातील विभागप्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, ग्रा.पं. सदस्य, युवासेना पदाधिकारी व बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.










