LIVE UPDATES

वेळास आगर येथे भव्य 'शेतकरी मेळावा'

शेतकऱ्यांना आधुनिक शेती - बागायत तंत्राची माहिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 18, 2026 20:53 PM
views 26  views

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आगर येथे स्थानिक शेतकऱ्यांसाठी एका भव्य 'शेतकरी मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. राकेश शेलार यांच्या पुढाकाराने झालेल्या या मेळाव्यात दापोली येथील विख्यात कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती आणि बागायतीचे तंत्र समजावून सांगितले.

 या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे दापोली कृषी विद्यापीठातून आलेले विख्यात कृषी अधिकारी. यामध्ये डॉ. अजय राणे सर, डॉ. अनिल गवळी सर, डॉ. अमोल दडेमल सर आणि श्री. आशिष भुवड सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. आंबा, काजू, फणस, सुपारी आणि तुळस यांसारख्या पिकांसाठी जमीन कशी असावी? कोणत्या मातीत कोणते बियाणे रुजवावे? आणि पिकांना नक्की कोणते खत द्यावे? याचे सखोल मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले. इतकेच नव्हे तर शेतातील पिकांपासून आयुर्वेदिक औषधे कशी तयार करावीत, याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

या मेळाव्याला वेळास आगर गावातील संतोष शिळकर, कृणाल मुरकर, संतोष राहटे, धोंडू नाईक, जनार्धन नाईक,रणजीत मुरकर, चंद्रकांत नाईक, संदीप लाड, प्रदीप मुरकर, तसेच महिला शेतकरी विद्या भाटकर, स्नेहा मुरकर, शरयू तोंडलेकर, मनीषा शिळकर यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोलीच्या कृषी अधिकाऱ्यांच्या या बहुमोल मार्गदर्शनामुळे वेळास आगरच्या बागायतदारांमध्ये आता एक नवा उत्साह पाहायला मिळतोय.