LIVE UPDATES

रुग्णांच्या पुढील मोफत उपचारांसाठी आमचे प्रयत्न : सचिन वालावलकर

शिबिरात रुग्ण किती आले हे महत्वाचे नाही
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 18, 2026 20:49 PM
views 63  views

  • आमदार दीपक केसरकरांच्या वाढदिवसाचं निमित्त 

  • शिबिराचा ४३७ रुग्णांनी घेतला लाभ


वेंगुर्ले : आमदार दीपकभाईंच्या वाढदिवशी कोणते मोठे सेलिब्रेशन न करता समाज उपयोगी उपक्रम राबवले जावेत हा त्यांचा नेहमी आग्रह असतो. त्यामुळे हे आरोग्य शिबिर गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आयोजित केले आहे. या शिबिरात रुग्ण किती आले हे महत्त्वाचे नसून त्यांच्यावर योग्य उपचार पुढे कसे होतील यावर आमचा भर असणार आहे. वालावलकर हॉस्पिटल डेरवण हे रुग्णालय सातत्याने गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी गेली कित्येक वर्ष काम करत आहे. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सरसारखे आजार आता कॉमन बनले आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याची तपासणी वेळेत करून घ्याल, तरच गंभीर आजारापासून दूर राहू शकाल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे केले.

उपजिल्हा रुग्णालयात आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुका शिवसेना, सचिन वालावलकर मित्रमंडळ,भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय डेरवण-रत्नागिरी व उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, ओरोस जिल्हा रुग्णालयाचे डॉ सुबोध इंगळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळा दळवी, जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, शहरप्रमुख अजित राऊळ, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, नगरसेविका लीना म्हापणकर, समिधा रेडकर, पंचायत समिती सदस्य साक्षी नार्वेकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विष्णूदास उर्फ दादा कुबल, कोचरा सरपंच योगेश तेली, महिला आघाडीच्या शीतल साळगावकर, वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र लिलके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश चौगुले, वैद्यकीय अधिकारी स्वप्नाली माने, डॉ मालखेडे आदी उपस्थित होते. 

शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. युवासेनेचे तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, पंकज शिरसाट, प्रथमेश सावंत, सत्यवान साटेलकर, संजय परब, संतोष परब, मितेश परब, कौशिक परब, संजय गावडे, काशिनाथ नार्वेकर, दत्ता साळगावकर, अण्णा वजराटकर, उमेश नाईक, बाबल केरकर, संदेश सडवेलकर, युवती सेनेच्या तालुका संघटक पूजा सोन्सुरकर, ज्योत्स्ना खराडे, नीलम वराडकर, उभादांडा उपसरपंच टीना अल्मेडा, मातोंड ग्रामपंचायत सदस्य दीपेश परब, विशाल राऊत, स्वप्नील होसमणी आदी उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबा कोचरेकर यांनी केले, तर आभार युवासेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी मानले.

डेरवण हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी 

या शिबिरात जनरल फिजिशियन, डॉ. तेजस राणे डॉ. विवेक सूर्यवंशी, जनरल सर्जन डॉ शमा खान, कान- नाक- घसा तज्ञ डॉ.पूजा गीते, त्वचारोग तज्ञ डॉ.नागनाथ मोरे, नेत्ररोग तज्ञ डॉ. पृथ्वीराज मोहिते, अस्तिरोग तज्ञ डॉ. राजवर्धन देशमुख, फिजिओथेरपी डॉ. विजयालक्ष्मी राव, डॉ. किरण कुंटे, डॉ. शुभम धारगळकर, डॉ, सत्यम आगलावे, डॉ, शिव मुंडे आदी डॉक्टर टीमच्यावतीने तपासणी करण्यात आली.  

यावेळी डेरवण रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. विवेक सूर्यवंशी म्हणाले, डेरवण येथील वालावलकर रुग्णालय कोकणातील रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. येथे असंख्य प्रकारच्या रोगांवर संशोधन व अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. सर्वच्या सर्व उपचार अत्यंत कमी खर्चात व गरिब व गरजू रुग्णांसाठी मोफत उपचारांची सुविधा दिली जाते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबरच जे आजार शासकीय योजनेत बसत नाहीत अशा आजारांवरील उपचारांसाठी गरीब रुग्णांसाठी विविध ट्रस्टच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिल्या जातात. येत्या २१ व २२ जुलै रोजी आज तपासणी केलेल्या व पुढे उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत असे त्यांनी सांगितले. डॉ. सुबोध इंगळे मार्गदर्शन करताना म्हणाले, या वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी अधीक्षक मिळावेत यासाठी आमदार केसरकर यांनी वारंवार मंत्रालयात मागणी केली होती. तसेच सातत्याने याचा सचिन वालावलकर यांनी पाठपुरावा केल्याने आता कायमस्वरूपी अधीक्षक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना आम्हा सर्वच पदाधिकाऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असतो. आमदार दीपक केसरकर नेहमीच जनतेचा विचार करत असतात. ज्या जनतेने त्यांना ४ वेळा निवडून दिले त्यांचे आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी त्यांचे प्रयत्न असतात.  यांचा वाढदिवस म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक नवा उत्साह असतो. या शिबिराचे सर्व श्रेय सचिन वालावलकर यांना जाते. दीपकभाईंच्या हातून यापुढेही समाजोपयोगी काम घडत राहो अशी प्रार्थना ईश्वरचरणी करतो असे ते म्हणाले. 

४३७ रुग्णांनी घेतला लाभ

या आरोग्य शिबिराला वेंगुर्ले तालुक्यातील विविध गावातील असंख्य गरजू रुग्णांनी गर्दी केली होती. उपजिल्हा रुग्णालयात विविध विभाग करून रुग्णांची अतिशय काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्याची यादी तयार करून डेरवण येथील रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत. ४३७ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.