LIVE UPDATES

दोन टक्क्यांचा विषय सभागृहात गाजला

सभापतींच आव्हान, संजू परबांनी पुरावेच दिले
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 10, 2026 20:20 PM
views 133  views

सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत गटबाजीही समोर

सावंतवाडी : टक्केवारीच्या आरोपावरून सावंतवाडी नगरपरिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. दोन टक्क्याचे विषय सभागृहात मांडण्यापलीकडे अन्य विषय सावंतवाडी शहरात नाहीतच का ? असे खडेबोल माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. यावर सभापती सुधीर आडिवरेकर यांनी पुरावे सादर करा असे आव्हान दिले. त्यावेळी चार विकास कामांचे पुरावे देत ही कामे पुर्ण होऊन, बिलापोटी प्रशासनाने काढलेले धनादेश महीना उलटला तरी अद्याप का दिले नाही ? असा सवाल उपस्थित केला. सभापती श्री. आडिवरेकर यांनी काम अपूर्ण असल्याचे सांगितले. हा धागा पकडत संजू परब यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाला कोंडीत पकडले. नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल, असे जाहीर केले. 

सावंतवाडी नगरपरिषदेची बैठक आज नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. दरम्यान, अनेक कामांना मुदतवाढ देण्याबाबतचे विषय सभागृहात मांडण्यात आले. यावेळी संजू परब चांगलेच आक्रमक झाले. पाणंदी सारख्या कामाला कुशल कामगार मिळत नाही हे कितपत योग्य असून विषय सूचीवर तब्बल २५ विकास कामांना मुदतवाढ देण्याचे विषय घेणे म्हणजे आपण ठेकेदारांच्या शिफारसी या ठिकाणी घेऊन आलात का ? असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला. तसेच आपले साटेलोटे आहे का ? सावंतवाडी शहरात अजून अन्य कोणत्या समस्या नाहीत का ? दोन टक्केचे विषय सभागृहात घ्यायच्या पेक्षा ठेकेदारांची विशेष सभा लावा. वेळ पडल्यास टक्केवारीच्या साटेलोटयाचे पुरावेच सभागृहात सादर करणार असे सांगितले. 


यावेळी सभापती सुधीर आडिवडेकर यांनी पुरावे सादर कराच असे आव्हान दिले. यावेळी शहरातील तब्बल चार विकास कामांचे पुरावे सादर करत विकासकामे पूर्ण होऊन त्या विकास कामांच्या बिलापोटीचे धनादेश प्रशासनाकडून काढून एक महिना उलटला तरी ते संबंधित ठेकेदारांना अदा करण्यात आलेले नाहीत. याचे उत्तर प्रशासनाने द्यावे असे स्पष्ट केले. यावेळी सभापती श्री आडिवरेकर यांनी ही कामे अपूर्ण असल्याचा दाखला समोर केला. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनानेच काम पूर्णत्वाचा दाखला दिला मग, काम अपूर्ण असल्याचा प्रश्नच येत नाही असे श्री. परब यांनी सांगितले. यावर श्री  आडिवरेकर यांनी प्रशासनालाच जाब विचारत आपण दाखला कसा काय दिला ? असे विचारले यावर मुख्याधिकारी यांनी नगर अभियंत्याकडे बोट दाखवले. एकूणच या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली. अखेर वाद वाढत असतानाच नगराध्यक्षांनी या प्रकरणी आपण चौकशी लावू व यातून मार्ग काढू असे सांगत या विषयावर पडदा टाकला. मात्र, टक्केवारीचा विषय सभागृहामध्ये चांगलाच रंगला.


दुसरीकडे याच विषयाचा धागा पकडत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी टक्केवारीवरून नगरपालिकेची बदनामी होत आहे. हा सभागृहाचा अस्मितेचा प्रश्न आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सुद्धा 57 कोटीच्या नळपाणी योजनेवरुन मुख्याधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे या गोष्टीचा मुख्याधिकारी या नात्याने खुलासा करावा अशी मागणी केली. यावेळी सभापती आडिवरेकर हे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी थेट सूर्याजी यांना रोखत बबन साळगावकर यांनी नळपाणी योजने संदर्भात बोलू नये, त्यांनीच या योजनेची पूर्ण वाट लावली असा आरोप केले. मात्र, श्री साळगावकर हे आपल्याच पक्षाचे असल्याचे सूर्याजी यांनी सांगितल्यावर ते आता आमच्या पक्षात आलेत असे स्पष्टीकरण श्री. आडिवरेकर यांनी दिले.


दरम्यान, शहरातील कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पिरापर्यंत जाणाऱ्या नाला बंदिस्त करणे या कामाला मुदत वाढ देण्यावरून देव्या सूर्याजी तसेच देवा टेमकर यांनी आक्षेप घेत ठेकेदार हा तकलादू कामे करतो त्यामुळे अशा ठेकेदाराला कामे न देता त्यांच्याकडून हे काम काढून घ्यावे, त्याला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशी मागणी केली. यावर योग्य ती चौकशी करून संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास ब्लॅकलिस्ट केले जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष सौ. भोसले यांनी दिले. तर नगरपरिषद अग्निशमन केंद्राचे विद्युतीकरण करणे, जिमखाना मैदान येथील ड्रेसिंग रूमचे विद्युतीकरण करणे आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे विद्युतीकरण करणे या कामाच्या मुदत वाडीवरून नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी आक्षेप घेत संबंधित ठेकेदाराकडून योग्यरीत्या काम केले जात नसल्याचे सांगितले. तर जिमखाना ड्रेसिंग रूमचे काम अर्धवट थांबले असताना त्या कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे अशी मागणी केली. मात्र, बिल अदा केले असले तरी त्याची डिपॉझिट रक्कम शिल्लक आहेत. योग्य काम न केल्यास त्याच्यावर ब्लॅक लिस्टची कारवाई केली जाईल असे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले. तर जिमखाना येथील ड्रेसिंग रूमचे बाथरूम सुरू नसल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या मुलींना तेथिलच पालिकेच्या जागेतील हॉटेलमध्ये बाथरूमला जावे लागते. परंतु, बाथरूमला जाण्यास अटकाव केला जातो. त्यावर प्रशासन म्हणून आपण योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही श्री. कुडतरकर यांनी केली. तर बॅरिस्टर नाथ पै सभागृह विनामूल्य उपलब्ध करून मिळण्याबाबत सनातन संस्थेने केलेल्या अर्जावर सभागृहात चर्चा झाली. यावेळी संबंधित संस्थेला सभागृह विनामूल्य स्वरूपात देण्यात यावा अशी मागणी नगरसेवक संजू परब यांनी केली. याला सभापती श्री. आडिवरेकर यांनीही संमती दर्शवली अखेर संपूर्ण सभागृहाने याला हिरवा कंदील दिल्याने अखेर सभागृह विनामूल्य देण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी मंजूर केला. तर इंदिरा गांधी व्यापारी संकुलनच्या भाडे निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या मूल्यांकनानुसार निर्णय घेण्यासंदर्भात सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावेळी ज्या गाळे मालकांकडून भाडे वसूल झाले नाही त्या मालकांकडून भाडे वसूल केल्यानंतर नव्याने भाडेवाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

तर आयत्यावेळीच्या विषयात पालिकेची पर्यटक स्वागत केंद्राची इमारत बंद अवस्थेत पडून आहे. इमारतीला दुरुस्तीसाठी मोठा खर्च आहे. मात्र, टेंडर काढताना खर्चासहित टेंडर काढून इमारत पुन्हा वापरात काढावी, अशी मागणी नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले. अन्यथा, इमारत पडून मोठे नुकसान होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे नगराध्यक्षांकडून सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्षांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगला आक्षेप घेत व्हिडिओ रेकॉर्डिंग रोखले. अध्यक्षांना अधिकार असल्याने त्याबाबतची सुचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या सभेवेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, प्रतिक बांदेकर, सुकन्या टोपले, देवा टेमकर, तौकीर शेख, ॲड. निता सावंत-कविटकर, बाबू कुडतरकर, देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, अजय गोंदावळे, वीणा जाधव, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. सायली दुभाषी, निलम नाईक,  दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते.

टिळक व वाजपेयींचा फोटो लावा : संजू परब

सभागृहात आयत्यावेळीच्या विषयात नगरसेवक संजू परब यांनी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांच्याकडे आपण कमळ या चिन्हावर निवडून आला आहात. सभागृहामध्ये इतर महापुरुषांच्या फोटो सोबतच अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो आदराने लावा, कॉग्रेसच्या नेत्यांचेच फोटो दिसतात. तर लोकमान्य टिळक सभागृह नाव असणाऱ्या या सभागृहात त्यांचाही फोटो लावावा अशी मागणी श्री. परब यांनी केली. यावर नगराध्यक्षांनीही हिरवा कंदील देत फोटो सभागृहामध्ये आदराने लावले जातील असे स्पष्ट केले.