LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील वसतिगृहांच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभा : तुटलेल्या खिडक्या, शौचालयांची दुरवस्था असल्याचा आरोप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 16:49 PM
views 22  views

सिंधुदुर्गनगरी : गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहात विद्यार्थिनींना सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या वसतिगृहांच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक वसतिगृहांमध्ये खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असून शौचालये व स्नानगृहांचीही दुरवस्था असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल पुढील सभेत सादर करावा, अशी मागणी सदस्या सुमेधा पाताडे यांनी केली.

जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची सभा मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती रुहिता तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत वसतिगृहांच्या प्रश्नावर चर्चा करताना गडचिरोलीतील घटनेचा दाखला देत जिल्ह्यातील वसतिगृहांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. वसतिगृहांमधील खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. शौचालये व बाथरुम नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे पाताडे यांनी निदर्शनास आणून दिले. आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

या मुद्द्यावर समितीतील सर्व सदस्यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व वसतिगृहांची पाहणी करून त्यांची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्ती तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल पुढील सभेत सादर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली.

आंतरजातीय विवाह योजनेची माहिती प्रत्येक सभेत द्या

आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेची परिपूर्ण माहिती प्रत्येक समाज कल्याण समितीच्या सभेत सादर करावी, अशी सूचनाही सदस्यांनी केली. महिन्यात किती प्रस्ताव प्राप्त झाले, त्यापैकी किती प्रस्ताव मंजूर झाले आणि किती लाभार्थींना अनुदान वितरित करण्यात आले, याचा सविस्तर आढावा प्रत्येक सभेत देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

योजनांची माहिती देणारे वाहन वस्तीत थांबवा

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी तसेच वसतिगृह प्रवेशाबाबत जनजागृती करण्यासाठी विभागाची वाहने समाजाच्या वस्त्यांमध्ये जातात. मात्र ही वाहने केवळ वस्तीतून फिरून पुढे जात असल्याने नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती मिळत नसल्याचा मुद्दा सुमेधा पाताडे यांनी उपस्थित केला. योजनांची माहिती देणारे वाहन वस्त्यांमध्ये काही काळ थांबवून नागरिकांना योजनांची माहिती, पात्रता व लाभ घेण्याची प्रक्रिया समजावून सांगावी. केवळ वाहन फिरवून जनजागृतीचा उद्देश साध्य होणार नाही, त्यामुळे वस्तीनिहाय थांबण्याचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.