LIVE UPDATES

बांबू शेतीला मिळणार उद्योगाची साथ

सिंधुदुर्गात रोजगाराच्या नव्या संधींचा आराखडा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 25, 2026 20:59 PM
views 44  views

  • जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे निर्देश 

सिंधुदुर्गनगरी : कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ आणि विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्हा नियामक मंडळाची सभा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात  संपन्न झाली. या बैठकीत आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला तसेच सन २०२६-२७ च्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कृषी क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या पर्यायी उद्योगांनाही प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून बांबू आधारित उद्योग आणि मूल्यवर्धन विषयक प्रशिक्षणांचा समावेश आत्मा वार्षिक कृती आराखड्यात करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. या प्रशिक्षणांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि युवकांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.

सभेत फार्मर आयडी नोंदणी प्रक्रिया आणि पीएम-किसान योजनेतील लाभार्थ्यांची सक्रिय नोंदणी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभाग, संस्था आणि यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत आत्मा योजनेंतर्गत गेल्या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी वर्षासाठीच्या नियोजनावर चर्चा करून त्यास मान्यता प्रदान करण्यात आली. प्रकल्प संचालक भाग्यश्री नाईकनवरे यांनी सादरीकरणाद्वारे मागील सभेच्या इतिवृत्तावरील कार्यवाहीचा आढावा मांडला. तसेच सन २०२५-२६ या वर्षात आत्मा अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध घटकांवरील खर्चासही सभेत मंजुरी देण्यात आली.

यावेळी सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या आत्मा वार्षिक कृती आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली आणि त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. याशिवाय आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समिती तसेच जिल्हास्तरीय शेतकरी सल्लागार समितीच्या गठणास मान्यता देण्यात आली. या समित्यांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या, गरजा आणि सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून कृषी विकासाला अधिक गती मिळणार आहे.

सभेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) प्रतिनिधी, आत्मा नियामक मंडळाचे सदस्य तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.