
सावंतवाडी : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीनुसार २७ जूनला किल्ले रायगडावर ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. याच दिवशी रायगडावर सार्वभौम स्वराज्याची स्थापना झाली आणि शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. या सोहळ्या प्रित्यर्थ व २६ जूनला तिथीने होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिव संस्कार तर्फे दरवर्षीप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा नेहमीप्रमाणेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या चारी राज्यांमध्ये घेण्यात येणार आहे. शिव शंभू चरित्र अभ्यासणे ही काळाची गरज आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास व्हावा व पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी शिवसंस्कार गेली पाच वर्षे स्पर्धांचे आयोजन करीत आहे.
स्पर्धा पुढीलप्रमाणे असून बुधभूषण श्लोक पाठांतर स्पर्धा छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी संस्कृत मध्ये 'बुधभूषण' हा ग्रंथ लिहिला. स्पर्धेसाठी श्लोक पाठांतर व त्याचा अर्थ सांगायचा आहे. वयोगटाप्रमाणे श्लोकांची संख्या दिलेली आहे.पहिला गट इ. पहिली ते चौथी एक श्लोक अर्थसहित, दुसरा गट इ.पाचवी ते आठवी तीन श्लोक अर्थासहित तिसरा गट इ. नववी ते बारावी चार श्लोक अर्थासहित, खुला गट १८ वर्षांपासून पुढे पाच श्लोक अर्थासहित व्हिडिओ एडिट केलेला नसावा.
वकृत्व स्पर्धा विषय राज्याभिषेक सोहळा असून संपूर्ण सोहळ्याचे वर्णन करणे अपेक्षित आहे. व्हिडिओ साठी पाच मिनिटे इतका वेळ देण्यात आलेला आहे. पहिला गट इ. ४ थी ते ८ वी, दुसरा गट इ.९ वी ते १२ वी, तिसरा गट १२ वी नंतर खुला गट तर गायन स्पर्धेसाठी 'शतकांच्या यज्ञातून उठली' हे गीत एका स्पर्धकाने किंवा समूहाने गायचे आहे. त्याचा व्हिडिओ पाठवायचा आहे. यामध्ये शाळासुद्धा सहभागी होऊ शकतात. ( सोलो/ ग्रुप)वाद्यवृंदासहित. तसेच,पावनखिंडीत आपल्या पराक्रमाने अद्वितीय विजय मिळवून देणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या दिनांक १३ जुलै रोजी असणाऱ्या पुण्यतिथीनिमित्त वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे वेशभूषा स्पर्धा ही सर्वांसाठी खुली असून कोणत्याही वयाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात. व्हिडिओ शिवसंस्कार च्या 9607827296 या अधिकृत नंबरवर दिनांक १५ जुलै, रात्री बारा वाजेपर्यंत पाठवायचा आहे. स्पर्धेची एन्ट्री फी रु 100/- शिव संस्कार चा क्यू आर कोड स्कॅन करून भरावयाची आहे. सर्व स्पर्धांचा निकाल ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. स्पर्धेतील व पूर्वी झालेल्या सर्व विजेत्या स्पर्धकांना शिव संस्कार च्या ऑक्टोबर २०२६ मध्ये होणाऱ्या सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे, त्याची तारीख संबंधित सर्व स्पर्धकांना आगाऊ कळवण्यात येईल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.











