LIVE UPDATES

मळेवाड पंचक्रोशीत हाय व्होल्टेजमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 25, 2026 20:52 PM
views 38  views

सावंतवाडी : मळेवाड पंचक्रोशीतील नागरिकांना सध्या वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यातील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरात हाय व्होल्टेजचा त्रास वाढल्याने अनेक घरांमधील विद्युत उपकरण निकामी होत आहेत तसेच इतर विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत.


याशिवाय विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या लागून वीज पुरवठा खंडित होत आहे.मात्र ह्या बाबत पावसाळ्याआधी या विद्युत वाहिन्यांवरील समस्या दूर करणे गरजेचे होते.मात्र या कडे दुर्लक्ष झाल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू असून किरकोळ पाऊस पडताच वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांवर तसेच लघुउद्योगांवर परिणाम होत आहे.


 महावितरण प्रशासनाने हाय व्होल्टेजची समस्या तातडीने सोडवून नियमित व सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज यंत्रणेची योग्य देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक होते.मात्र सद्य स्थितीत  झाडांच्या फांद्या, वेली ह्या जवळ जवळ सगळीकडे विद्युत पुरवठा करणाऱ्या पोलावर, तारांवर आल्याने ह्या समस्यां उद्भवत आहेत.त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. संबंधित विभागाने या समस्यांची दखल घेऊन खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.