
सावंतवाडी : सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी गणेशोत्सवात स्थानिक महिलांसोबत थेट फुगडीचा फेर धरून गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित केला.
गौरी-गणपतीच्या काळात घरोघरी श्री गणेशाचे आगमन झालेले असताना नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी शहरातील विविध भागांत जाऊन गणेश दर्शन घेतले.
सावंतवाडी संस्थानच्या सून आणि शहराच्या प्रथम नागरिक असूनही कोणतीही औपचारिकता न बाळगता, त्यांनी थेट जनतेच्या दारात जाऊन दर्शन घेण्याला प्राधान्य दिले. दर्शनादरम्यान एका घरात स्थानिक महिलांचा फुगडीचा खेळ रंगला होता.
लोकसंस्कृती, परंपरा आणि सणाचा उत्साह पाहून सौ. श्रद्धाराजे भोसले स्वतःला रोखू शकल्या नाहीत. अतिशय सहजतेने आणि उत्साहाने त्याही या पारंपरिक खेळात सहभागी झाल्या आणि महिलांसोबत फुगडीचा फेर धरला. यावेळी नगरसेविका स्नेहा नाईक देखील त्यांच्यासोबत फुगडीत सहभागी झाल्या.










