अवकाळी पावसाचा फटका !

आंबा-काजू बागायतदारांचे मोठे नुकसान ; सभापती सिद्धेश रावराणेंकडून नुकसानीची पाहणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 28, 2026 20:04 PM
views 40  views

वैभववाडी : तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आखवणे, मौदे आणि जांभवडे या गावांतील आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक काजू व आंब्याची झाडे उन्मळून पडली असून फळांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे. या नुकसानीची सभापती सिद्धेश रावराणे व प.स.सदस्य देवानंद पालांडे यांनी पाहणी केली.

तालुक्याला मागील दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपले. भुईबावडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात या भागातील मौदे, आखवणे, जांभवडे या गावातील आंबा काजू बागांचे मोठं नुकसान झालं. अनेक बागांमधील झाडं मोडून पडली. तसेच फळांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे.

आज सभापती श्री रावराणे आणि सदस्य श्री पालांडे यांनी  या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानाचा आढावा घेतला व शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या पाहणीदरम्यान तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख तसेच जिल्हा परिषद कृषीचे अजित अडुळकर उपस्थित होते.