
पुणे : लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या 'श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळा'तर्फे किल्ले रायगडावर दि. १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आणि दुर्गसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे ३४६ वे शिवपुण्यतिथी वर्ष असून, विशेष म्हणजे १९२५-२६ साली झालेल्या शिवछत्रपतींच्या समाधी जिर्णोद्धाराचे हे शताब्दी वर्ष आहे.
प्रमुख पाहुणे आणि सन्मान
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेचे खासदार आणि भाजपा प्रवक्ते मा. सुधांशु त्रिवेदी उपस्थित राहणार आहेत. प्रतिवर्षी दिला जाणारा 'श्रीशिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार' यंदा ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक आनंद पाळंदे यांना प्रदान केला जाणार आहे.
तसेच, हिंदवी स्वराज्याचे सरदार नागपूरकर भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजीराजे भोसले आणि निवृत्त ब्रिगेडियर संग्राम मोहिते यांचाही विशेष सन्मान यावेळी केला जाईल. शाहिरी कार्यक्रमासाठी शाहीर विक्रम अवचिते यांची उपस्थिती लाभणार आहे.
शिवपुण्यतिथीच्या आदल्या दिवशी श्री शिवशंभू विचार मंचाच्या वतीने दुर्गसंवर्धन परिषद होणार आहे. यामध्ये:
प्रा. प्र. के. घाणेकर
डॉ. सचिन जोशी
महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे
यांची व्याख्याने आणि सादरीकरणे होणार आहेत. सन्मानित होणाऱ्या सर्व मान्यवरांची मुलाखत आदल्या रात्री गडावरील 'राजसभेत' पार पडेल.
रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी मंडळाच्या वतीने न्याहारी, भोजन, निवास आणि स्वच्छतेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल, अशी माहिती मंडळाचे सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे आणि कार्यवाह सुधीर थोरात यांनी दिली आहे.
श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे आणि कार्यवाह सुधीर थोरात यांनी सर्व शिवप्रेमींना मोठ्या संख्येने रायगडावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.












