
सिंधुदुर्गनगरी : महायुती सरकार शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी राबवत असलेले उपक्रम राज्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थाचालक, शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले आहे त्याबद्दल सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कौतुक केले. जागतिक व आधुनिक ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून शाळांना संगणक संच वितरित होत आहे यासाठी आमदार निरंजन डावखरेनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे! तर शाळांच्या संच मान्यतेचा प्रश्न इतिवृत्त बदलून तो बैठकीतील निर्णयाप्रमाणे होणार आहे अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास पदवीधर शिक्षक आमदार निरंजन डावखरे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, सभापती संतोष साटविलकर, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, संदीप मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील ६५ शाळांना संगणक संचाचे वितरण करण्यात आले. हे संगणक संच आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीमधून देण्यात आले.
सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित शाळांना संगणक संच वितरण कार्यक्रमात बोलताना त्यांनी पदवीधर शिक्षक आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “सरकारमध्ये प्रभावी भूमिका असलेल्या डावखरे यांनी शिक्षण क्षेत्रासाठी आपला आमदार निधी वापरात असून या जिल्ह्यात त्यांनी काम केले आहे, शाळांना संगणक संच वितरित करून जिल्ह्यात डिजिटल शिक्षणाची चळवळ उभी केली आहे,”जगातील आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शाळा तिथे संगणक’ ही संकल्पना राबवण्यात येत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील तब्बल ६५ शाळांना आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून संगणक संचांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. याबद्दलचे त्यांनी कौतुक केले.
कोकणातील मुसळधार पाऊस व डोंगराळ
भौगोलिक परिस्थितीमुळे शाळांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संच मान्यतेचे निकष शिथील करण्यासाठी मंत्रालयात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सर्व मंत्री व आमदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीतील निर्णयानुसारच सुधारित इतिवृत्त तयार होईल आणि कोकणातील शाळांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही नितेश राणे यांनी दिली. एकूणच, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिजिटल शिक्षणाला मिळालेली ही गती आणि शासनाकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद यामुळे शिक्षण क्षेत्रात नवा आशावाद निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ही महत्त्वाची पायरी ठरत आहे. असेही ते म्हणाले.
आमदार निरंजन डावखरे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीचे तसेच जिल्ह्यातील कोकणातील शाळांच्या प्रश्नाबाबत घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. पुढच्या काळात विद्युत बिलाचा खर्च कमी करण्यासाठी सोलर पॅनल बसवून ग्रीन शाळा करण्याचा संकल्प ही त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रभाकर सावंत यांनी भारतीय जनता पक्षाचे सरकार शैक्षणिक विकास व शाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. हे चांगले चित्र या सरकारच्या काळात दिसू लागले आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.












