
चिपळूण : श्री गौरी-गणपती उत्सवानिमित्त होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चिपळूण आगाराने बससेवेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चिपळूण आगारातून सुटणाऱ्या काही नियमित व जादा बससेवा मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी शिवाजीनगर बसस्थानक (हायवे) येथून सोडण्यात येणार आहेत.
या निर्णयानुसार मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण, भांडुप, डोंबिवली, नालासोपारा, चिंचवड, स्वारगेट, बदलापूर आणि पनवेल या मार्गावरील सर्व नियमित तसेच जादा बसेस शिवाजीनगर बसस्थानकातून सुटतील. श्री गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती चिपळूण आगार व्यवस्थापकांनी दिली आहे.
प्रवाशांनी संबंधित कालावधीत आपल्या प्रवासाचे नियोजन करताना बस सुटण्याच्या ठिकाणातील बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चिपळूण आगारातर्फे करण्यात आले आहे.










