
सिंधुदुर्गनगरी : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 11 या कालावधीत श्रमदानाच्या माध्यमातुन मंदिरे व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत जिल्हावसियांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक आणि ग्रामस्थांची ये-जा होत असते. उत्सव, जत्रा, पालख्या, धार्मिक सोहळे अशा प्रसंगी येणारी गर्दी वाढत आहे. यामुळे या परिसरात प्लास्टिक, कागद, कोरडे गवत, पानफुलांचे अवशेष आदी कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि पवित्र राहणे हे केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर समाज आरोग्य, पर्यटन विकास आणि ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहे. या हेतुने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सकाळी 8 ते 11 या कालावधीत मंदिरे व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांकरीता लोकसहभाग वाढविण्याकरीता मंदिर देवस्थान समिती, गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, स्वंयसेवी संस्था, ग्रामस्थ यांचा सहभाग घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांत जिल्हावसियांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.












