
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा हजार लाभार्थी लाभ घेत आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून ३.३४ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. वीज बचत, पर्यावरण संरक्षण व आर्थिक लाभअशा तिहेरी फायद्यांनी ही योजना नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग मंडलचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौरउर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी योजनेत मिळत आहे.
घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौरउर्जानिर्मिती संच बसविता यावा, यासाठी बँकांनी सवलतीच्या व्याजदराने कर्ज प्रक्रियाही सुलभ केली आहे. महावितरणकडून १० किलोवॅ टपर्यंतच्या अर्जाना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. सौर नेट मीटरही देण्यात येत आहेत. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना अंदाजे १२० युनिट वीजनिर्मिती होते. वीज ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज सौरउर्जा प्रकल्पातून तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येते. केंद्र सरकारकडून घरगुती ग्राहकांना पहिल्या दोन किलोवॅटसाठी प्रत्येकी ३० हजार रु., तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रु. अनुदान थेट मिळते. योजनेत मोफत वीज मिळते. यासंबंधातील सर्व प्रक्रिया ऑनलाईन व सुलभ करण्यात आली असल्याचे महावितरणने म्हटले आहे












