
कुडाळ : जमीन हा सृष्टीचा मूलभूत आधार आहे आणि मानवी जीवनाच्या अन्न वस्त्र निवारा या प्रमुख गरजा जमिनी या नैसर्गिक स्त्रोत्रामधून वर्षानुवर्ष पूर्ण केल्या जात आहेत,.त्यापैकी सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे अन्न आहे आणि या सृष्टीवरील 90% पेक्षा जास्त सजीव अन्नासाठी जमिनीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नावर अवलंबून आहेत :परंतु दुर्दैवाने जे अन्न तयार होते ते विषयुक्त असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम माणसाच्या आरोग्यावर झालेला आहे.पुढील येणारी माणसाची पिढी निरोगी व सुदृढ जन्माला यावी असे वाटत असेल तर आत्तापासूनच खालावलेल्या जमीन आरोग्याकडे गांभीर्याने बघणे फार आवश्यक आहे आणि खालावलेले जमिनीचे आरोग्य दुरुस्त करून जमीन पुन्हा एकदा सशक्त व निरोगी कशा प्रकारे करता येईल यासाठी प्रत्येक नागरिकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग चे मृदा शास्त्रज्ञ डॉक्टर विकास धामापूरकर यांनी केले. जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित बांबुळी या ठिकाणी आज आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी भाग्यश्री नाई नवरे कुडाळ तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगुले, जिल्हा मृद चाचणी अधिकारी मुळे, आत्माचे निलेश गोसावी, बांबुळी सरपंच प्रशांत परब, उपसरपंच सुभाष बांबुळकर, कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती अभय परब व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री धामापूरकर यांनी गेल्या काही वर्षात जमिनीचे खालावलेली आरोग्य परिस्थिती व त्याचा माणसाचा आरोग्यावर झालेला विपरीत परिणाम विस्तृतपणे उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिला. ही खालावलेली जमिनीची परिस्थिती जर सुधारावरची असेल तर शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कृषी निविष्ठांचा काटेकोर वापर करणे आवश्यक आहे याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. कोकणामध्ये आढळणाऱ्या जुन्या भाताच्या जाती किती प्रमाणात गरजेचे आहे हे सांगताना प्रत्येक भात पिकाचं वैशिष्ट्य शेतकऱ्यांना विस्तृत करून त्यातील अन्नपदार्थ कशाप्रकारे कोकणातील माणसाचे आरोग्यमान उंचावत होते याचा उदाहरणासह उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले.आज शेतकरी कुठलीही पीक पद्धती घेतली तर त्या पिकामध्ये रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा तणनाशकांचा अवाजवी आणि असंतुलित वापर करताना सर्रासपणे दिसत आहेत आणि त्यामुळेच जमिनीचे आरोग्य बिघडले असून त्यामुळे जमिनीमध्ये असलेले सूक्ष्मजीव जंतू व गांडूळ त्यांची संख्या कमालीची कमी झालेली आहे. त्यामुळे जमिनीचा जिवंतपणा नष्ट झालेला आहे. प्रत्येक मातीचा जिवंतपणा हा जमिनीमध्ये असलेल्या असंख्य सूक्ष्मजीव जंतूंच्या संख्येवर अवलंबून आहे आणि हेच सूक्ष्मजीव जंतू पीक वाढीसाठी आवश्यक वातावरण जमिनीच्या गर्भामध्ये तयार करत असतात आणि त्यापासूनच शेतकरी वर्षानुवर्षे शेती मधून उत्पादन घेत असतात. परंतु गेल्या 25 वर्षांमध्ये शेतीसाठी आवश्यक असणारे जीवजंतू व गांडूळ यांची संख्या शेतकऱ्याच्या चुकीच्या व्यवस्थापन पद्धतीमुळे कमी झालेली दिसते त्याचाच परिपाक म्हणून की काय की आपले पीक उत्पादन हे शाश्वत राहिलेले नसून त्यामध्ये माणसाच्या शरीराला अनावश्यक घटक पण शोषली जातात आणि त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर झालेला आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे चक्रीकरण करणे आवश्यक आहे जेणेकरून जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्मजीव जंतूंना खाद्य मिळेल व त्यांचे जमिनीमध्ये असलेले कार्य जोमाने सुरू राहील शेतीमध्ये ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खताचा वापर करावा जेणेकरून रासायनिक खतांची मात्रा कमी लागेल व जमिनीची सच्छिद्रता वाढवून जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता व पाणी मुरण्याचा वेग यामध्ये पण कमालीचा बदल घडून येईल. गो आधारित शेती पद्धतीचा वापर करत असताना जीवामृत घन जीवामृत याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीमधील खर्चाची बचत होऊन जमिनीचे आरोग्याबरोबरच विषमुक्त पिक उत्पादन घेण्यास मदत होणार आहे. शक्य असेल त्या ठिकाणी देशी नांगराच्या साह्याने नांगरणी करावी जेणेकरून यांत्रिकीकरणामुळे जमिनीमध्ये जो टनकपणा आलेला आहे, त्याच्यावर थोड्याफार प्रमाणावर मात करण्यात आपण यश मिळू शकतो देशी नांगराच्या साह्याने नांगरणी केल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली आवश्यक असणारी पांढरी मुळे शाबूत राहून पीक उत्पादन वाढविण्यास त्यांची मदत होते. अशा प्रकारे येणाऱ्या काळात शेतीमध्ये हिरवळीच्या खतांचा वापर देशी गांडुळांची संख्या वाढविणे जमिनीमध्ये आवश्यक असणाऱ्या सूक्ष्मजीव जंतूंची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे शेतीमध्ये आच्छादनाचा वापर करणे मशागतीसाठी आवश्यक त्या ठिकाणी देशी नगराचा वापर करणे अशा काही सोप्या गोष्टींचा अंतर्भाव शेतीमध्ये केला तर शाश्वत पीक उत्पादनाबरोबरच विषमुक्त पीक उत्पादन घेण्यास उत्पादन शेतकरी घेऊ शकतो असे श्री विकास धामापूरकर यांनी या ठिकाणी नमूद केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुडाळ तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी तसेच उप कृषी अधिकारी यांनी फार मेहनत घेतली कार्यक्रमाला दशक्रोशीतील बहुसंख्या शेतकरी उपस्थित होते. आभार साटम यांनी मांडले.












