
दोडामार्ग : दोडामार्ग येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी कारवाई केली. त्याला तब्बल १ लाख ६३ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
एक डंपर गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वाळू घेऊन जात होता. दोडामार्ग शहरात तो आला असता नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी तो थांबवला व चालकाकडे पासची मागणी केली. पास नसल्यामुळे त्यांनी तो तहसील कार्यालयात आणला. वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी डंपर मालकाला १ लाख ६३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. महसूल प्रशासनाने मध्यरात्री अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली. मात्र, दिवसाढवळ्या व सूर्यास्तानंतर देखील डंपर मधून होणाऱ्या काळ्या दगडाच्या वाहतुकीवर महसूल प्रशासन केव्हा कारवाई करणार? हा सवाल सर्व स्तरातून विचारला जात आहे.













