
दोडामार्ग : साटेली भेडशी (भोमवाडी) येथील ७६ वर्षीय निवृत्त व्यक्तीस अज्ञात इसमांनी फोन व मोबाईलच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शिवराम कृष्णाजी राणे यांच्या मोबाईलवर १७ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान एका महिलेस अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवून धमकी देत असल्याचे सांगत अज्ञात इसमांनी त्यांच्याशी संपर्क साधला. तक्रार डेटा प्रोटेक्टर बोर्ड ऑफ इंडिया येथून असल्याचे भासवत राहुल रॉय नावाच्या इसमासह भिसे व पाटील या अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांच्या खात्यावर करोडो रुपये जमा झाल्याचे दिशाभूल करून एफ.डी. कागदपत्रे केवायसीसाठी मागवली.
त्यानंतर RTGS फॉर्म भरून फिर्यादी यांच्या एफ.डी. मधील रक्कम बँक ऑफ इंडिया खात्यात आणून पंजाब नॅशनल बँक, बॅनरघट्टा शाखा, बेंगळुरू (नेमीचंद यांच्या नावावर) या खात्यावर ५,००,२०८ रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. त्यामुळे फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक झाली.
या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नं. १७७/२०२५ भा.दं.वि. १३५, ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(C), ६६(D) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













