LIVE UPDATES

शेठ म. ग. हायस्कूलमध्ये विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 08, 2026 13:06 PM
views 57  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक प्रविण खडपकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी समिती सदस्य व सहाय्यक शिक्षक शामू जंगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. तसेच इयत्ता नववी ‘ड’ मधील विद्यार्थिनी ओवी बापट हिने विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोमवार, ७ सप्टेंबर रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी-शिक्षक दिन’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमात एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि प्रार्थनेने दिवसाची सुरुवात झाली.

यावेळी कुमार अधिराज बलवान यांनी मुख्याध्यापक, तर स्नेहा नागरगोजे यांनी पर्यवेक्षिका म्हणून शाळेच्या कामकाजाची धुरा सांभाळली. शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कु. सानिका तारी, सर्वेश कोयंडे आणि  मंथन मेस्त्री यांनी जबाबदारी पार पाडली.

विद्यार्थी-शिक्षकांनी विविध वर्गांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन करून शिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव घेतला. संस्थेचे पदाधिकारी तसेच शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी-शिक्षकांचे कौतुक केले.दिवसभराचे कामकाज ‘वंदे मातरम्’ने पूर्ण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी-शिक्षकांनी शालेय वेळेनंतर आपल्या अध्यापनाच्या अनुभवांचे कथन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन समिती सदस्य संतोष चव्हाण, शामू जंगले, रश्मी ठाकूर आणि आफ्रिन पठाण यांनी केले. मुख्याध्यापक प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबांवकर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमाचे संस्था पदाधिकारी, शिक्षक आणि पालक वर्गातून कौतुक व अभिनंदन करण्यात आले.