LIVE UPDATES

साळगाव-माणगाव पूलाखाली आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

कुडाळ तालुक्यात खळबळ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 08, 2026 11:13 AM
views 182  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलाखाली मृतदेह दिसताच संबंधित पोलीस पाटलांनी याची गांभीर्याने दखल घेत तातडीने कुडाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळाची पाहणी करून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

सदर मृतदेह नेमका कोणाचा आहे आणि या व्यक्तीचा मृत्यू अपघाताने झाला, घातपाताने की अन्य काही कारणाने, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

पोलीस प्रशासनाकडून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, आसपासच्या परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. या घटनेमुळे साळगाव आणि परिसरात सध्या चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या सखोल तपासानंतर आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.