LIVE UPDATES

पर्ससीन मासेमारीवर कठोर कारवाई करा

पारंपरिक बिगर यांत्रिकी रापण संघाची मागणी ; मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे यांना निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 08, 2026 13:35 PM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update##FishermenProtest#DevgadNews#SindhudurgNews

देवगड :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर पर्ससीन नेट व मिनी पर्ससीन नेटच्या मासेमारीमुळे मोठा परिणाम होत असून, या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पारंपरिक बिगर यांत्रिकी रापण संघ, देवगड यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास परवाना अधिकारी किरण वाघमारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

 निवेदनात म्हटले आहे की, देवगड परिसरातील पारंपरिक मच्छीमार समाजातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पिढ्यान्‌पिढ्या पारंपरिक मासेमारीवर अवलंबून आहे. रापण पद्धतीच्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमार तसेच कामगारांना रोजगार आणि उदरनिर्वाह मिळतो. मात्र सध्या पर्ससीन नेट व मिनी पर्ससीन नेटच्या माध्यमातून होणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर मोठा विपरीत परिणाम होत असल्याचे संघाने निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे.

पर्ससीन नेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असल्याने पारंपरिक मच्छीमारांना मिळणाऱ्या मासळीच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे. परिणामी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेचे संरक्षण करणे तसेच समुद्रातील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी क्षेत्रात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या मिनी पर्ससीन नेट व पर्ससीन नेट मासेमारीची तात्काळ पाहणी करून संबंधित नियमांनुसार दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रापण संघाने केली आहे.

तसेच संबंधित विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रापण संघाच्या हद्दीतील नियमबाह्य मासेमारीवर नियंत्रण आणावे आणि पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पारंपरिक बिगर यांत्रिकी रापण संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी रापण संघाचे विश्वास भुजबळ, शशिकांत लब्दे, संतोष लब्दे, दिनेश धुवाळी , उत्तम जोईल, अनिल जोईल ,संतोष कातवणकर, अशोक पेडणेकर, शामराव शिंदे, वाडेकर, ठुकरूल, तसेच विजयदुर्ग मुणगे परिसरातील संघाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्याकडे निवेदन सादर करून या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.