
देवगड : तालुक्यातील तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्या मंदिर येथे शिक्षक दिनानिमित्त तसेच श्रावण महिन्याचे औचित्य साधून ‘श्रावणधारा’ या विशेष कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.परब यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील योगदान आणि भारतीय संस्कृतीतील श्रावण महिन्याचे महत्त्व याविषयी मनोगते व्यक्त केली.
‘श्रावणधारा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रावणातील सण-परंपरा, भक्तिगीते, समूहगीते तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमामुळे शाळेच्या परिसरात आनंदी व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. यावेळी शाळेतील शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. चव्हाण, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सान्वी शिरवडकर व आभार कुमारी वेदिका दुखंडे हिने मानले.










