LIVE UPDATES

कुंब्रल गावचे सुपुत्र शिक्षक विजय सावंत यांना लायन्स क्लब पुरस्कार प्रदान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 07, 2026 12:51 PM
views 34  views

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लबच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबईचे माजी शेरीफ जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावचे सुपुत्र तथा शिक्षक विजय सावंत यांच्यासह राहुल जगताप व अन्य गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या लायन्स क्लब ऑफ मीडटाऊन यांच्या वतीने देण्यात आलेला लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार स्वीकारल्यानंतर विजय सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “हा माझा एकट्याचा सन्मान नसून ज्या संस्थेने आपल्या शाळेत मला शिकविण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्या सोशल सर्विस लीग संस्थेचा आणि पर्यायाने माझ्या विद्यार्थ्यांचा व सहकारी शिक्षकांचाही सन्मान आहे, असे मी समजतो. रात्रशाळेत येणारे विद्यार्थी वयाने मोठे असतात. दिवसभर कुठेतरी काम करत असतानाही अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणि मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते रात्रशाळेत प्रवेश घेतात आणि यशस्वी होतात.”

या कार्यक्रमाला विजय परदेशी यांच्यासह विविध पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, संस्थाप्रमुख तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यस्तरावर शैक्षणिक क्षेत्रात योगदान

विजय सावंत यांनी SCERT, पुणे; MEPA, औरंगाबाद; RAA, औरंगाबाद व नाशिक आदी ठिकाणी राज्यस्तरावर इंग्रजी तसेच अन्य विषयांच्या संदर्भात शैक्षणिक काम केले आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये QR कोड तयार करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शिक्षणमंत्र्यांकडून प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातही विजय सावंत यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांचे ‘प्रकाश किरणाच्या शोधात’ आणि ‘जगण्याचे आर्त’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तर त्यांचा ‘धाकावयले कावळे’ हा कथासंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.