LIVE UPDATES

शालेय जलतरण स्पर्धेत वेंगुर्ल्यातील जलतरणपटूंची चमकदार कामगिरी

विभागीय जलतरण स्पर्धेसाठी सात जलतरणपटूंची निवड
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 19:45 PM
views 14  views

वेंगुर्ला : ओरोस येथे ९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शालेय जलतरण स्पर्धेत वेंगुर्ल्यातील जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर वेंगुर्ल्यातील तब्बल सात जलतरणपटूंची सांगली येथे होणाऱ्या विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

१४ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात मदर तेरेसा इंग्लिश स्कूलची कुमारी वीरा मिलिंद शिवलकर हिने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, ५० मीटर फ्री स्टाईल आणि १०० मीटर फ्री स्टाईल या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच एम. आर. देसाई स्कूलची विद्यार्थिनी लक्षिता सागर चौधरी हिने १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

वेंगुर्ला हायस्कूलचा कुमार अर्णव ओंकार ओतारी याने १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात ५० मीटर फ्री स्टाईल आणि १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी श्रेयस कृष्णा साटेलकर याने १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.

१४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हर्षाक टेमकर याने २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये द्वितीय, तर १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. वेंगुर्ला शाळा क्रमांक ३ चा विद्यार्थी प्रसन्न नारायण बर्वे याने ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये द्वितीय, तर २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

तर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थ प्रवीण परब याने १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक मिळवत आपली छाप पाडली. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वेंगुर्ल्यातील या सातही जलतरणपटूंची सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना जलतरण प्रशिक्षक दीपक सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल वेंगुर्ला शहराचे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आणि विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.