
देवगड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आंबा बागायतदारांनी दहन केल्यानंतर भाजपचे माजी आमदार अजित गोगटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबा बागायतदारांना दिलेली धमकीची भाषा त्यांना शोभणारी नसल्याचा टोला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला. “गोगटे साहेबांनी संयम बाळगावा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
देवगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले की, “विद्यमान पालकमंत्री आमदार असताना तुमच्या घरावर फेकलेली अंडी तुम्ही विसरलात काय? मात्र देवगडवासीय ते विसरलेले नाहीत. त्या काळात तुम्ही दहशत अनुभवली होती. आज तुमच्या बाजूला बसलेल्यांनीच त्यावेळी अंडी फेकली होती,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
यावेळी तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, गणेश गावकर, हर्षा ठाकूर, काका जेठे, सीमा धुरी, प्रसाद दुखंडे, सुधीर जाधव, जगन्नाथ गुरव, लक्ष्मण कदम आदी उपस्थित होते.
नाईक पुढे म्हणाले की, “खरं म्हणजे गोगटे यांनी आंबा बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. झाडाला मिळालेली केवळ २२० रुपयांची नुकसान भरपाई तुम्हाला मान्य आहे का, हे त्यांनी जाहीर करावे. आंबा बागायतदारांचा मेळावा घेऊन ‘ही नुकसान भरपाई आम्हाला मान्य आहे आणि पुढे आणखी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगावे. तेव्हा त्यांच्या सोबत किती बागायतदार आहेत हे समोर येईल.”
“माझ्या माहितीनुसार आप्पासाहेब गोगटे यांच्यासोबत असलेले अनेक आंबा बागायतदार आज त्यांच्यासोबत राहिलेले नाहीत. गोगटे यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेतली, मात्र दोन्ही वेळा आंबा बागायतदारांच्या विरोधातच भूमिका घेतली. जर आप्पासाहेब गोगटे आज असते, तर सरकार कोणाचेही असो ते आंबा बागायतदारांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले असते. त्यांची बांधिलकी शेतकऱ्यांशी होती. मात्र आज ती बांधिलकी राहिलेली दिसत नाही,” अशी टीकाही नाईक यांनी केली.
यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. “आज सिंधुदुर्गातील भाजप पूर्णपणे राणेमय झाली आहे. देवगड आणि ओरोस येथे झालेल्या आंबा बागायतदार मोर्चामध्ये हजारो बागायतदार सहभागी झाले होते. हे सर्व केवळ काँग्रेस किंवा उबाठाचे कार्यकर्ते होते असे म्हणणे चुकीचे आहे. सर्व पक्षांतील शेतकरी त्यात सहभागी झाले होते. एका बाजूला पालकमंत्री ‘सर्व पक्ष संपवले’ असे सांगतात, तर दुसरीकडे काँग्रेस उबाठाचे एवढे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात. यावरून पुढील निवडणुकीत तुमच्या आमदाराचा पराभव निश्चित आहे,” असा दावा त्यांनी केला.
शिक्षणाच्या प्रश्नावर बोलताना नाईक म्हणाले की, “जिल्ह्यातील २५६ जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरून त्या नियमित सुरू करून दाखवा. शिक्षक भरती करून वर्षभर त्या शाळा व्यवस्थित चालवल्या, तर आम्ही स्वतः नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेऊ. आज निम्म्याहून अधिक शाळा प्रभावीपणे सुरू नाहीत.”तसेच विकासकामांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मोठा गाजावाजा करून सुरू केलेली रो-रो सेवा बंद पडलीच ना? देवगड-कणकवली परिसरात आणलेला एकतरी प्रकल्प वर्षभर सातत्याने सुरू राहिला आहे का? पंधरा वर्षे आमदार राहून नेमकी कोणती ठोस कामे केली हे जनतेसमोर मांडावे,” असे आव्हान त्यांनी दिले.
“आम्हाला आवाहन करू नका, आवाहन स्वीकारायला आम्ही तयार आहोत. यापुढील आमची आंदोलने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असतील. तुम्हाला जे करायचे असेल ते करा. आम्ही आता आंदोलनांची पूर्वसूचना देऊनच मैदानात उतरणार,” असा इशाराही युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.












